Chhatrapati Sambhajinagar Rain  Update : गेल्या अनेक दिवसांपासून खंड पडलेल्या छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा (Rain) अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार, छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय. शहरातील अनेक भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचं पाणी तुंबल्याचं चित्र पाहायला मिळालं. तर, रेल्वे स्टेशन रोडवरील एमटीडीसी कार्यालयाजवळील एका रिक्षावर झाड कोसळल्याची घटना देखील समोर आली आहे. त्यामुळे याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली असून, झाड हटवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, सकाळी 11 वाजेनंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं. त्यानंतर दुपारी बारा वाजेनंतर पावसाला सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक भागात या पावसाने हजेरी लावली. सोबतच बिडकीन, चितेगाव, गेवराई, वैजापूर, खुलताबाद,जरुळ फाटा येथे मुसळधार पाऊस सुरू होता. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून अशा जोरदार पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. त्यामुळे आज झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य छत्रपती संभाजीनगरकरांना देखील दिलासा दिला आहे. 


रेल्वे स्टेशन झाड कोसळलं...


पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक दिवसांनी आज पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाचा वेग अधिक असल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचं चित्र दिसून येत आहे. याचवेळी रेल्वे स्टेशन ते क्रांती चौक रोडवरील एमटीडीसी कार्यालयासमोरील एक झाड अचानक रस्त्यावर कोसळ. विशेष म्हणजे यावेळी झाडाखाली एक रिक्षा उभी होती. त्यामुळे झाड पडल्याने रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. पण, मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे याची माहिती तात्काळ वाहतूक शाखेला देण्यात आली. सोबतच अग्निशमन दलाला देखील याबाबत कळवण्यात आले. त्यानंतर रस्त्यावरील झाड बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, वाहतूक पोलिसांकडून देखील वाहतूक सुरळीत केली जात आहे. 


शेतकऱ्यांना दिलासा मिळाला!


ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात तरी चांगला पाऊस होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, सप्टेंबर महिन्याचे देखील वीस दिवस कोरडे गेले. त्यानंतर उरलेल्या दहा दिवसात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार मागील दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात आणि जिल्ह्यात पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय. काल आणि आज झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे पिकांना जीवनदान तर मिळालाच आहे, पण कोरड्या पडलेल्या विहिरींमध्ये देखील काही प्रमाणात पाणी येण्याची शक्यता आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


नागपुरात ढगफुटी सदृश पाऊस; नागनदीला पूर, घरांमध्येही पाणी शिरलं, वाहानांचं मोठं नुकसान