Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहरात बिबट्याचा वावर (leopard Terror) असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. दरम्यान, सोशल मिडियावर बिबट्याला पकडल्याचे काही व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम होता. पण, हे व्हिडिओ जूने असून नाशिक, सोलापूर विभागातले असल्याचे वनविभागाने पडताळले आहे.


दरम्यान, शहरातील बिबट्या अजून पकडला गेला नसून वनविभागाने बिबट्या समोर दिसला तर काय करावे, काय करू नये अशी सूचना प्रकाशित केल्या आहेत.


बिबट्याची शहरात दहशत कायम


 छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या तीन दिवसापासून एका बिबट्याचा वावर आहे. हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असला तरी बिबट्याचा मागमूस लागत नसून नागरिकामध्ये दहशतीचे (Leopard terror) वातावरण पसरले आहे. सापळा रचूनही बिबट्या सापडत नसल्याने वनविभागाची चांगलीच धांदल उडाली असून बिबट्या नक्की गेला कुठे असा प्रश्न खुद्द वनविभागालाच पडला आहे.


छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी परिसरात (Ulkanagri Area) आणि आता थेट एका मॉलच्या सीसीटीव्ही बिबट्या कैद झाला आहे. मागील तीन दिवसांपासून वनविभागाकडून 70 ते 80 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करूनही बिबट्या सापडला नसल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 


तीन दिवसानंतरही बिबट्याचा सुगावा लागेना


छत्रपती संभाजीनगर शहरात अनेक रहिवाशांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरात बिबट्याचे दर्शन घडल्यानंतर वनविभागाने सापळा रचूनही आता तीन दिवस उलटत आले आहेत. तीन दिवसानंतर ही बिबट्याचा सुगावा लागत नसून बिबट्या नक्की गेला कुठे असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.


बिबट्या अचानक समोर आला तर...


1.बिबट्या अचानक समोर आला तर नागरिकांनी खाली बसू नये. कारण बिबट्या हा त्याच्या उंचीएवढ्या किंवा कमी उंची असणाऱ्यांवर झाडप घालतो. त्यामुळे लहान मुले किंवा खाली बसलेल्यांना बिबट्याच्या हल्ल्याची सर्वाधिक भीती आहे.


2.जर आपल्या परिसरात बिबट्या असण्याची भीती असल्यास काठी आदळत चालणे, गाणी वाजवत चालल्याने बिबट्या हल्ला करण्याची शक्यता कमी होते.


3.बिबट्या समोर दिसला तर घाबरून न जाता आरडाओरड करून त्याला पळवून लावावे.


4.बिबट्या अचानक समोर आला तर त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये. यामुळे तो अधिकच बिथरून हल्ला करू शकतो.


5.अचानक बिबट्या दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करावा, त्यास त्याच्या मार्गाने जाऊ द्यावे आणि याबाबत वनविभागाला संपर्क साधवा, हेल्पलाईन नंबर १९२६ डायल करावा.


हेही वाचा:


Leopard Terror: छत्रपती संभाजीनगरात बिबट्याची दहशत, सापळा रचूनही मागमूस लागेना, बिबट्या नक्की गला कुठे? वनविभागाची उडाली धांदल