Chhatrapati Sambhajinagar: जी 20 परिषदेच्या (G-20 Conference) निमित्ताने जगभरातील पाहुणे छत्रपती संभाजीनगर शहरात येणार असल्यामुळे प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून शहराचा चेहरा मोहरा बदलला होता. मात्र पाहुणे जाताच नागरिकांनी शहराचं पुन्हा विद्रूपीकरण करायला सुरुवात केली आहे. एवढंच काय तर रस्त्यावर ठेवलेल्या फुलांच्या कुंड्या अक्षरशः चोरीला जात असल्याने उचलून नेण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे.
झगमगणारी रोषणाई, रात्रीच्या वेळेस चमचम चमकणारी ऐतिहासिक स्थळे आणि चकचकाक रस्ते... हे चित्र मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरच. जी 20 परिषदेच्या निमित्ताने जगभरातील वेगवेगळ्या देशातील पाहुणे शहरात येणार असल्यामुळे प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून शहराचा चेहरा मोहरा बदलला. तर या सुंदरतेत भर पडावी म्हणून शहरातील विमानतळ, क्रांतीचौक, जालना रोड, हॉटेल ताज, बारापुल्ला गेट आदी भागात तब्बल 1200 शोभीवंत झाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र यातील 213 कुंड्या आणि 25 फोकस लाईट काही नागरिकांनी चोरून नेल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी दिल्लीत ही असाच काही प्रकार समोर आला होता आणि आता छत्रपती संभाजीनगर शहरात. आता कुंड्या चोरी जात असल्याने महानगरपालिकांना रस्त्यावर ठेवलेल्या कुंड्या उचलण्यास सुरुवात केली आहे. शिवाय प्रशासनाकडून आता सीसीटीव्हीची पाहणी करून अशा लोकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
कधीकाळी आशिया खंडातील सर्वात वेगाने प्रगती करणारं शहर म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील विकास भकास झाल्याचे चित्र होते. मात्र जी 20 मुळे शहराचे रूपड पालटलं आहे. एखाद्या विदेशातील शहरात फिरतोय असा फील छत्रपती संभाजीनगरवासियांना येतोय, पण काही लोकांमुळे शहर पुन्हा भकास होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळ, क्रांतीचौक, जालना रोड, हॉटेल ताज, बारापुल्ला गेट आदी भागातून शोभीवंत झाडांच्या मोठ्या कुंड्या गायब होत असल्याचं समोर आलं आहे. दुभाजकांमध्ये लावलेली फुलांची झाडेही नागरिकांनी उपटून नेली.
एवढंच नाही तर रंगवलेल्या भिंतीवरदेखील काही नागरिकांनी पिचकारी मारून आपल्या शहाणपणाची निशाणी त्यावर कोरली आहे. नंतर औरंगाबाद पोलिसांनी 60 पेक्षा अधिक नागरिकावर गुन्हे दाखल केले मात्र तरी देखील कुंड्यांची चोरी झालीच. कुंड्या चोरीला जात असल्याने चोरी जात असलेल्या कुंड्या उचलून घेण्याची प्रशासनावर आलेली नामुष्की याचीच सुरवात आहे.
ही बातमी वाचा: