Chhatrapati Sambhajinagar : कोचिंग क्लासेसमध्ये झालेल्या दोन मुलीच्या भांडणावरुन एका मुलीच्या आई वडिलांनी काही लोकांच्या मदतीने दुसऱ्या मुलीच्या आईवडिलांना घरात घुसून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच आईसोबत घाणेरडे वर्तन केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. मारहाण करणाऱ्या आरोपी आई वडिलांनी दुसऱ्या महिलेला पायावर नाक घासायला लावून माफी मागायला लावल्याचा प्रकार देखील घडला आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरातील सर्वेश्वरनगरमध्ये घडली आहे. 

गुन्हा दाखल 

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप लंके आणि त्याची पत्नी आणि अनोळखी दोघे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मारहाण झालेल्या संदीप श्रीधर शिंदे रा. सर्वेश्वरनगर, सातारा यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. शुल्लक कारणावरून झालेल्या या वादात फिर्यादी शिंदे यांच्या पत्नीला जबर मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या पाठीवर, हातावर, चेहऱ्यावर मारहाणीचे वळ स्पष्ट दिसून येत आहेत. 

नेमकं प्रकरण काय?

संदीप शिंदे हे त्यांची पत्नी छाया आणि मुलींसह सर्वेश्वरनगरमध्ये राहतात. त्यांची मोठी मुलगी (वय 17) एका खासगी शिकवणीत जाते. तिथे तिचा लंके यांच्या मुलीसोबत वाद झाला होता. शिक्षकांनी मध्यस्थी करत, दोघींना समजावले आणि वाद मिटवला. यानंतर लंके हे शिंदेच्या दुकानावर जात तुझी मुलगी कुठे आहे, तिला समोर बोलवं, तिने माझ्या मुलीला क्लासमध्ये माफी मागायला लावून अपमानित केले, असे म्हणून  शिवीगाळ केली. यावेळी लंके यांनी ‘माझा मोठा भाऊ पीआय’  आहे. त्याच्याशी बोलून घे त्यानंतर फोनवर बोलणे झाले. त्यानंतर ते तिथून निघून गेले. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता शिंदे हे घरी बसलेले असताना, संदीप लंके त्याची पत्नी आणि आणखी दोन जण हातात दांडे आणि रॉड घेऊन आले. यावेळी पुन्हा तुझी मुलगी कुठे आहे, आम्हाला तिला मारायचे आहे असे म्हणून ते ओरडत होते. लंके यांनी हातातील दांड्याने शिंदे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. सोबत असलेल्या दोघेही  मारहाण करायला लागले. लंके यांची पत्नी देखील मारहाण करत होती. आरडा ओरडा ऐकून  शिंदे यांची पत्नी छाया ही वरच्या मजल्यावरून खाली आली. पतीला का मारत आहेत ? असा जाब त्यांनी विचारला. यानंतर लंके यांच्या पत्नीने शिंदे यांच्या पत्नीचे केस धरून तिला मारहाण केली. यावेळी जातीवाचक शिवीगाळ देखील केली. 

या सर्व प्रकारात शिंदे यांच्या शेजाऱ्यांनी घराजवळ येऊन लंके यांना दरवाजा उघडण्यास सांगितले. लंके यांनी दार उघडताच शिंदे यांच्या पत्नी छाया या त्यांच्या मैत्रिणीच्या घरी धावत सुटल्या. तिथून त्यांनी घटनेची कल्पना पोलिसांना दिली. काही वेळाने पोलीस तेथे दाखल झाले. यावेळी देखील संदीप लंके यांनी माझा भाऊ पीआय आहे, मीच मारहाण केली, असे बोलत होता. यानंतर शिंदे यांनी सातारा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी  उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवले. यानंतर प्रकरणी शिंदे यांच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

हैदराबादच्या कुटुंबाला नांदेडमध्ये भर रस्त्यावर मारहाण, माजी आमदाराने केली सुटका, नेमकं प्रकरण काय?