छत्रपती संभाजीनगर: राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर महिलांसंबधी मोठ्या गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत. मुंबई, पुण्यातील स्वारगेट प्रकरण त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर एका धक्कादायक बातमीने हादरलं आहे. शरीरसुखाची मागणी केल्यानंतर महिलेने नकार दिल्याचा संताप आल्याने 19 वर्षीय तरूणाने भावकीतीलच 36 वर्षांच्या महिलेवरच सपासप वार करून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तिला तब्बल 280 टाके घालावे लागले आहेत. सव्वादोन फुटांचा एक वार महिलेच्या मानेपासून ते मांडीच्या खालीपर्यंत आहे. मरणयातनांपेक्षा भयंकर वेदना पिडीत महिला सहन करत एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. डोकं सुन्न करणारी घटना आहे. क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे.
महिलेने सांगितलं नेमकं काय घडलं?
एका वृत्तवाहिनीशी बोलताना पिडीत महिलेने सांगितलं की, माझ्यावर त्याने एवढे वार केलेत की डाक्टरला गोधडीवानी माझं अंग शिवावं लागलंय. हे टाके शिवण्यासाठी दोराच 22 हजार रुपयांचा लागला आहे. एकही अवयव असा नाहीये की जिथे फाडलेलं नाही. त्या घावांमुळे अंगवर आगडोंब उठला आहे. सहन होत नाही, पण रडताही येत नाही. कारण, डोळ्यातून आलेलं पाणी टाके शिवलेल्या जखमेला लागलं तर आणखीच आग उठते. आता मी करू तरी काय असं ती म्हणते. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
यामध्ये माझी काहीच चूक नव्हती. त्यानं मला फाडूनच टाकलं. रविवारी दुपारी मी शेतात काम करत असताना अभिषेकचा मला फोन आला. तो फोनवर म्हणाला की, एक तर तू माझ्याबरोबर झोप, नाही तर तुझ्या जावेशी माझे जुळवून दे... असं कसं ऐकून घेणार, मला राग आला आणि फोन कट केला. संध्याकाळी मी शेतातलं काम संपवून रस्त्याने जात असताना अचानक पाठीमागून येऊन त्याने माझी वेणी ओढली आणि डोकं दगडावर आपटलं. मला काही समजायच्या आतच त्यानं पहिल्यांदा कटरनं चेहऱ्यावर वार केला. मी ओरडायचा प्रयत्न केला तर त्याने गळ्यावरच वार केला आणि लगेच सपासप सगळीकडे वार केले. पाठीवरचा वार तमानेपासून मांडीपर्यंत आहे. त्यात माझे कपडेसुद्धा फाटून गेले. त्याने वार केल्यानंतर माझं रक्त काही थांबत नव्हतं. त्यातच त्यानं मोठा दगड उचलला आणि माझ्या खालच्या भागावर मारला. मी आणखीच विव्हळले. तर त्यानी दुसरा दगड माझ्या तोंडावर मारला आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधारच झाला. शुद्धीत आले तेव्हा डोळा पण उघडत नव्हता. दोन्ही हाताला सलाइन लावलं आहे. कसातरी मी एक डोळा उघडायचा प्रयत्न केला. सगळं अंग दुखतंय, पण रडून उपयोग नाही. 280 टाके घालण्यासाठी दोऱ्याचाच खर्च 22 हजार रूपये आला आहे.
400 मिली रक्त वाया, 5 बाटल्या रक्त शरीरात चढवलं
पीडित महिलेच्या शरीरावरती झालेल्या वारांमुळे तब्बल 400 मिली रक्त वाया गेलं आहे. संपूर्ण शरीरावर मिळून 280 टाके घालण्यात आले. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने आतापर्यंत त्यांना 5 बाटल्या रक्त शरीरात चढवलं आहे.
नराधमाच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नाही
आरोपी नराधम अभिषेक तात्याराव नवपुते (19, रा. घारदोन) या घटनेनंतर संपूर्ण गावात काही घडलेच नाही अशा स्थितीत फिरत होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही दिसला नाही. अतिशय क्रुरतेने त्याने हा डाव साधला असल्याच्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.