छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange) सतत आंदोलन करत असतांना, आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. दुसरीकडे मराठा आरक्षण मिळत नसल्याने एकामागून एक तरुण आपले आयुष्य संपवत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील पैठणच्या आपेगाव येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्याने आत्महत्या केली असून, त्याच्याजवळ एक सुसाईड नोट देखील मिळून आली असल्याची माहिती समोर येत आहेत. ज्यात 'मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असून, माझ्या मुलाने नेत्यांच्या नादी लागू नयेत' असा उल्लेख आहे. सोपान भागवतराव औटे  (वय 40 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपेगाव येथील सोपान भागवतराव औटे यांनी गट क्र. 316 मधील शेतातील लिंबाच्या झाडाला सोमवारी सकाळी 8 वाजता गळफास घेतला. याबाबत माहिती मिळताच पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह खाली उतरवून पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला. पंचनाम्यादरम्यान पोलिसांना एक चिठ्ठी मिळून आली. त्यात 'माझ्या मृत्यूशी वैयक्तिक कोणाचा काही एक संबंध नाही. मराठा योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या नाकातून रक्त आले, तरीही सरकार आरक्षण देत नाही. या सरकारचा निषेध म्हणून मी आत्महत्या करीत आहे' असा उल्लेख आढळला. तर, याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत


सुसाईड नोटमध्ये काय लिहले आहे...


मी सोपान औटे, माझ्या मृत्यूची वैयक्तिक कुणाचा काही एक संबंध नाही. मराठा योद्धा मनोज दादा जरांगे यांच्या नाकातून रक्त आले, तरीही हे सरकार आरक्षण देत नाही. म्हणून मी या सरकारचा निषेध म्हणून आत्महत्या करत आहे. माझा मुलगा आदि संतांच्या, देवाच्या नादी लाग. बाळा कोणत्याच नेत्याच्या नादी लागू नको....


मनोज जरांगे रुग्णालयात दाखल...


मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सोमवारी 17 व्या दिवशी उपोषण सोडले आहेत. उपोषण सोडल्यावर त्यांच्यावर उपचार केले जात असून, यासाठी जरांगे हे छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच तीन-चार दिवस उपचार घेऊन आपण राज्याचा दौरा करणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे याच दौऱ्यातून मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


संभाजीनगरच्या गरुडझेप अकॅडमीत आणखी एक आत्महत्या, पोलिसांच्या छापेमारीत मोठा खुलासा