Samruddhi Mahamarg News: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) उद्घाटन केलं. त्यानंतर सर्वसामान्यांसाठी समृद्धी महामार्ग प्रवासासाठी खुला करण्यात आला. मात्र या महामार्गावर होणारे अपघात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळेच आता अपघात रोखण्यासाठी आरटीओने (RTO) पुढाकार घेतला आहे. यासाठी आरटीओकडून समृद्धी महामार्गावर विशेष मोहीम राबवली जात आहे. समृद्धी महामार्गावर एन्ट्री करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. तसेच घासलेल्या टायरच्या वाहनांना परत पाठवण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांत अशा 67 वाहनांना आरटीओने परत पाठवले आहे. विशेष म्हणजे, आणखी सात दिवस अशाप्रकारे समृद्धी महामार्गावर आरटीओ विभागाकडून तपासणी सुरूच राहणार आहे.


गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे, वाहनांचे टायर गुळगुळीत असल्याने अपघात होत असल्याचं समोर आलं आहे. टायर घासलेले असल्याने वेगात वाहन चालवल्याने टायर फुटून वाहनांनाचे अपघात होत आहेत. तर गुळगुळीत टायर असलेल्या वाहनातून समृद्धीवरून प्रवास करू नका, असा सल्ला यापूर्वीच पोलिसांनी दिला आहे. मात्र असे असताना अनेक वाहनचालक टायर घासलेल्या वाहनातून प्रवास करत आहेत आणि त्यातून अपघात होत आहेत. त्यामुळे आता अशा वाहनांवर आरटीओकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे तुमच्या चारचाकी वाहनाचे टायर घासून गुळगुळीत झालेले असतील तर समृद्धी महामार्गावर जाण्याचे टाळलेलेच योग्य ठरेल, अन्यथा तुम्हाला देखील अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरावे लागेल. 


आणखी सात दिवस वाहन तपासणी मोहीम चालणार 


सोमवारपासून आरटीओने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली असून, गेल्या तीन दिवसांत तब्बल 560 वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावर एन्ट्री करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात असून, घासलेल्या टायरची 67  वाहने परत पाठविण्यात आली. पुढे आणखी सात दिवस वाहन तपासणी मोहीम चालणार आहे. परिवहन आयुक्त विवेक भीमनवर आणि राज्य रस्ता सुरक्षा कक्ष उपायुक्त भरत कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्धी महामार्गावरील सर्व जिल्ह्यांत ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावरील चार पॉइंट्सवर सोमवारपासून ही तपासणी मोहीम सुरू आहे.


पहिल्या 100 दिवसांत जवळपास 900 पेक्षा जास्त अपघात


समृद्धी महामार्ग प्रवासासाठी सुरु झाल्यापासून सतत अपघात होत आहे. वेगावर नियंत्रण नसल्याने आणि टायरची स्थिती वाईट असल्याने या महामार्ग पहिल्या 100 दिवसांत जवळपास 900 पेक्षा जास्त अपघात झाले आहेत. या अपघतांत शेकडो जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे अपघात कमी करण्यासाठी आता आरटीओने प्रत्येक जिल्ह्यात तपासणी मोहीम सुरू केली आहे.


कशी सुरु आहे आरटीओची कारवाई



  • टायर घासलेले असतील तर अतिवेगाने, उन्हाने ते फुटण्याचा धोका नाकारता येत नाही. 

  • टायर फुटल्यानंतर भरधाव वाहन उलटण्याचीही शक्यता असते.

  • महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा निर्णय झाला असून,  ही तपासणी मोहीम त्यातीलच एक भाग आहे, असे सांगण्यात आले.

  • तपासणी मोहिमेदरम्यान नियंत्रित वेग, सीटबेल्टचे महत्त्व आणि टायरमध्ये नायट्रोजन भरण्याबाबतही वाहनचालकांचे समुपदेशन देखील करण्यात येत.

  • तसेच टायर घासलेले असेल तर त्या वाहनांना समृद्धी महामार्गावर प्रवेश दिला जात नसून, त्यांना परत पाठवले जात आहे.


महत्वाच्या इतर बातम्या : 


शहरातील शांतता भंग करणाऱ्या दोघांना एमपीडीएखाली स्थानबद्ध; छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई