Hanuman Jayanti 2023 : दरवर्षी हनुमान जयंती (Hanuman Jayanti) मोठ्या उत्साहात 6 एप्रिलला साजरी केली जाते. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) हनुमान जयंतीचं वेगळ महत्व आहे. कारण निद्रिस्त अवस्थेतील महाराष्ट्र राज्यातील एकुलता एक मारुती जिल्ह्यातील खुलताबाद येथील श्री. भद्रा मारुती संस्थानच्या मंदिरात पाहायला मिळतो. छत्रपती संभाजीनगर शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर खुलताबाद हे तालुक्याचे ठिकाण असून, येथे भद्रा मारुती मंदिरात दर्शन घेण्यासाठी देशभरातील भक्त येत असतात. तर हनुमान जयंतीला या ठिकाणी मोठी गर्दी असते. 


देशभरात गावोगावी हनुमानाची मूर्ती उभ्या अवस्थेतील पाहायला मिळते, पण खुलताबाद येथील भद्रा मारुतीची मूर्ती मात्र निद्रिस्त म्हणजेच, झोपलेल्या अवस्थेतील आहे. विशेष म्हणजे, सदैव श्रीराम सेवेत तत्पर असणारे हनुमान हे खुलताबादला निद्रावस्थेत पाहून भक्तांना आश्चर्य वाटते. निद्रिस्त अवस्थेतील महाराष्ट्र राज्यातील एकुलता एक मारुती म्हणजे, खुलताबाद येथील भद्रा मारुती. खुलदाबाद हे ठिकाण हिंदू दैवत भद्रा मारूती संस्थान या तीर्थक्षेत्रासाठी देखील विशेष परिचित आहे. भद्रा मारूती या ठिकाणी हनुमानाची निद्रिस्त अवस्थेतील भव्य मूर्ती आहे. अशा प्रकारची निद्रिस्त मारुतीची मूर्ती भारतात केवळ तीन ठिकाणी आहे. त्यातील एक ठिकाण उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हे असून दुसरे खुलताबाद आहे आणि तिसरे ठिकाण मध्य प्रदेशातील जामसावळी येथे आहे. मात्र खुलताबाद येथील निद्रिस्त अवस्थेतील मूर्तीबाबत एक प्राचीन कथा प्रचलित आहे.


निद्रिस्त अवस्थेतील मूर्तीबाबत अशी आहे प्राचीन कथा... 


असे सांगितले जाते की, त्रेतायुगात श्रीराम भक्त असलेला भद्रसेन नावाचा एक राजा येथे राज्य करायचा. भद्रसेन राजा श्रीरामाचा निस्सीम भक्त असल्याने तो सतत रामभक्तीत तल्लीन असायचा. तसेच भद्रकुंडाजवळ बसून तो रामधून गात असे, आणि त्यांच्या राम धूनमध्ये चेतन आणि अचेतन सृष्टीही भावमय होत असे. एकदा असेच हनुमान या परिसरातून जात असताना त्यांच्या कानी भद्रसेन राजाची रामधून पडली. रामधूनेतील माधुर्य आणि आतर्ता पाहून हनुमानजी भावविभोर झाले. हुनमान हे रामधून ऐकण्यात इतके तल्लीन झाले की, त्यांना निद्रावस्था प्राप्त झाली.


जेव्हा भद्रसेन राजाची रामधून संपली तेव्हा हनुमानजी अतिशय भावविभोर स्थितीत निद्रावस्थेत असल्याचे दिसले. त्यावेळी हनुमंतानी राजास वर मागण्यास सांगितले. भद्रसेन राजाने सांगीतले की, प्रसन्न होऊन वर देत असाल तर आपल्या चरणी नतमस्तक होऊन एकच विनंती की, आपण येथेच राहून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. राजाने मागितलेल्या वरास तथास्तु म्हणून अंतर्धान पावले. तेव्हा ज्या ठिकाणी ही मूर्ती प्रगट झाली. येथे निद्रिस्त दिसत असली तरीही अत्यंत जागृत असे भद्रा मारुती देवस्थान सर्वत्र प्रसिद्ध झाले.


महत्वाच्या इतर बातम्या : 


जगातील सर्वात उंच व महाकाय 'हनुमान'! पाहा तब्बल 105 फूट मूर्ती