Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) राम नवमीच्या पूर्वसंध्येला दोन गटात शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रुपांतर दगडफेक आणि जाळपोळमध्ये झाल्याची घटना किराडपुरा भागात घडली होती. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी 400 पेक्षा अधिक हल्लेखोरांवर गुन्हे दाखल केले असून, आरोपींची धरपकड करत आहेत. मात्र शुल्लक कारणावरून झालेला वाद मिटल्यावर देखील पुन्हा मोठा जमाव जमवण्याच्या मागे काही लोकांचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, जमावात आलेल्या तरुणांना चिथावणी देणाऱ्यांमध्ये स्वत:ला धर्माचा अभ्यासक सांगणारा आणि जमीन खरेदी-विक्रीचे काम करणारा एक व्यक्ती असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, बुधवारी (29 मार्च) रोजी मध्यरात्री तरुणांची माथी भडकावून त्यानंतर या व्यक्तीने शहर सोडल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले असल्याचे वृत्त 'दिव्य मराठी'ने दिले आहे.
नेमकं काय घडले?
पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मार्च रोजी सुरवातील दोन गटात शुल्लक कारणावरून वाद झाला आणि तो मिटला देखील होता. मात्र त्यानंतर एका गटाचे अंदाजे 50 लोकांचा जमाव पुन्हा त्या ठिकाणी आला. पण पोलिसांनी त्यांना देखील पांगवले होते आणि वाद मिटला होता. मात्र दीड तासाने अचानक मोठा जमाव त्या ठिकाणी आला आणि त्यांनी दगडफेक करत जाळपोळ केली. त्यामुळे पोलीस आयुक्ताने सांगितल्याप्रमाणे दीड तासाने आलेला जमाव आला कोठून, गल्लीबोळातून अचानक जमाव कसा येत होता. याचा तपास पोलीस करत आहे. तर पोलिसांनी वाद मिटवल्यानंतर, याच वेळी काही समाजकंटकांनी त्याचा गैरफायदा घेतला. किराडपुरा परिसरातून वाद घालणारे तरुणांचे गट निघून गेल्यानंतर अर्ध्या तासामध्ये जिन्सी परिसरात अफवांचे पीक पसरवण्यात आले आणि त्यामुळेच या ठिकाणी मोठा जमाव आला. त्यामुळे अफवा पसरवणाऱ्या आणि तरुणांना चिथावणी देणाऱ्यांचा आता पोलीस शोध घेत आहे.
त्याच रात्री शहर सोडून फरार...
'दिव्य मराठी'ने दिलेल्या वृत्तानुसार, किराडपुरा भागात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत जमावाला उद्युक्त करणाऱ्यांची काही नावे पोलिसांनी निष्पन्न केली असून, यात 8 ते 12 जण असल्याची शंका आहे. विशेष म्हणजे यात प्रामुख्याने स्वत:ला धर्म अभ्यासक असल्याचे सांगणारा व्यक्ती आहे. मूळ बीड शहरातील रहिवासी असलेला हा व्यक्ती आठ वर्षांपूर्वी जिन्सी भागात राहण्यासाठी आला होता. तर किराडपुरा भागात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या रात्री त्याची भूमिका महत्त्वाची होती. तसेच त्याच दिवशी पहाटे त्याने शहर सोडून पलायन केले आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
छ.संभाजीनगरमध्ये 'त्या' रात्री काय घडलं? महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव