Corona update Chhatrapati Sambhaji Nagar : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona) फैलाव होताना पाहायला मिळत असताना, छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) देखील पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर वाढते कोरोना रुग्णसंख्या पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतानाच संशयित रुग्णांची कोरोना टेस्टिंग वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती महानगरपालिका आरोग्यविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच, यासाठी मनपाच्या प्रत्येक आरोग्य केंद्रावर टेस्टिंग किट उपलब्ध करून दिल्या जाणार असून, तशा सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.


छत्रपती संभाजीनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. दरम्यान वाढत्या रुग्णसंख्या पाहता बुधवारी (5 एप्रिल) रोजी मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. तर या बैठकीत सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना आणि केंद्रावरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांना कोरोना तपासण्या वाढवण्याबाबत आणि इतर सर्व तपासण्या सर्व आरोग्य केंद्रांवर करण्याबाबत निर्देश देण्यात आले. यासाठी सर्व केंद्रांवर टेस्टिंग किट उपलब्ध करून घेणे, टेस्टिंग वाढविणे, संशयित रुग्णांची तपासणी करणे, पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील संशयितांची टेस्टिंग करून घेणे, रुग्णांचे सॅम्पल जिनोम सिक्वेंसिंगसाठी व्हीअडीएल लॅबला पाठविणे इ. माहिती माहिती देण्यात आली. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण राठोडकर, डॉ. प्रेरणा संकलेचा, डॉ. मेघा जोगदंड यांच्यासह सर्व आरोग्य केंद्रांचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि कोरोना वॉर रूममधील कर्मचारी यांची उपस्थिती होती.


बैठकीतील सूचना...



  • महानगरपालिका हद्दीतील सर्व केंद्रांवर टेस्टिंग किट उपलब्ध करून घेणे, टेस्टिंग वाढविणे, संशयित रुग्णांची तपासणी करणे.

  • पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील संशयितांची टेस्टिंग करून घेणे, रुग्णांचे सॅम्पल जिनोम सिक्वेंसिंगसाठी व्हीअडीएल लॅबला पाठविणे.

  • पोर्टलवरील कर्मचाऱ्यांनी सर्व माहिती अचूक व पूर्ण भरावी.

  • चाचणीपूर्वी रुग्णांचे अचूक नाव, मोबाइल नंबर, तपशील, पत्ता घेणे, त्याची खातरजमा करावी, जेणे करून रुग्णांचा शोध घेण्यास अडचण निर्माण होणार नाही 


जिल्ह्यात आणखी 5 नवे रुग्ण 


जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा वाढल्याने रोज नवे रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी (5 मार्च) रोजी शहरात 4, तर ग्रामीणमध्ये 1 नवे असे जिल्ह्यात एकूण 5 नवे रुग्ण आढळले. तर, शहरातील तीन रुग्णांची सुट्टी झाली आहे. सध्या जिल्ह्यात 66 सक्रिय रुग्ण असून, यांतील तीन रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये, तर 63  जण घरीच उपचार घेत आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातह 3 मार्चपासून सातत्याने कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत चढउतार सुरू आहे. शहरातील विविध भागांत फैलाव वाढला असताना ग्रामीणमधील अनेक तालुक्यांमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


मोठी बातमी: छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाविरुद्धची याचिका न्यायालयाने फेटाळली; शहरांची नावे बदलण्याचा अधिकार सरकारचा