Chhatrapati Sambhaji Nagar Fire : छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Naga City) छावणी परिसरात असलेल्या जैन मंदिराजवळ असलेल्या तीन मजली ईमारतमध्ये असलेल्या कपड्याच्या दुकानाला आग (Fire) लागल्याने एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात दोन पुरुष, तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, तपास करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे आता आग कशी लागली याचा तपास देखील केला जात असून, काही प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे. Chhatrapati Sambhaji Nagar Fire Side Story
अधिक माहितीनुसार आग लागलेल्या ईमारतमध्ये तीन मजले होते. ईमारतीचे मालक असलम शेख खालच्या मजल्यावर आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होते. तसेच खालच्या मजल्यावर कपड्याची दुकान होती. दुसऱ्या मजल्यावर मृत्यू झालेलं कुटुंब आणि तिसऱ्या मजल्यावर आणखी दोघे राहत होते. दरम्यान, आज पहाटे साडेतीन वाजता कपड्याच्या दुकानाला सुरवातीला आग लागली. पुढे आग वाढत गेली. लोकांच्या लक्षात येताच त्यांनी ईमारतमध्ये राहणाऱ्या लोकांना याची माहिती देऊन त्यांना जागी केली. यावेळी पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावरील लोकांना वाचवण्यात यश मिळाले, पण दुसऱ्या मजल्यावरील लोकं झोपेत असल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.
एक चार्जिंग सॉकेट अन् पूर्ण घरात आग...
प्राथमिक माहितीनुसार सुरवातीला कपड्याच्या बाहेर लावण्यात आलेल्या एका चार्जिंगच्या दुचाकीमध्ये जोराचा स्फोट झाला. यावेळी या दुचाकीला चार्जिंगसाठी चार्जर लावण्यात आलेले होते. त्यामुळे वायरच्या माध्यमातून आग थेट दुकानात लावलेल्या चार्जिंग सॉकेटपर्यंत पोहचली आणि दुकानात देखील आग लागली. कपड्याचे दुकान असल्याने काही वेळातच आग संपूर्ण दुकान आणि त्यानंतर ईमारतमध्ये पसरली. विशेष म्हणजे दुसऱ्या मजल्यावर आतमध्ये येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट असल्याने खालच्या लोकांना वरती जाता आले नाही. त्यामुळे दुसऱ्या मजल्यावरील लोकांना वाचवण्यात अपयश आले.
लोकांनी असा वाचवला जीव...
या ईमारतीचे मालक शेख अस्लम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री तीन ते साडेतीन वाजता दुकानात आग लागली. याबाबत नागरिकांनी आम्हाला आवाज देऊन माहिती दिली. त्यानंतर ईमारतवरून खाली उतरण्यासाठी सीडी आणण्यात आली आणि त्या माध्यमातून आम्ही खाली उतरलो. आम्ही सात लोकं सीडीच्या माध्यमातून खाली आल्याने वाचलो आहे. मात्र, दुसऱ्या मजल्यावरील सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, तिसऱ्या मजल्यावर देखील दोन लोकं होती, ते सुद्धा सुदैवाने वाचली आहे. दुसऱ्या मजल्यावर ज्या सात लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश होता. सात लोकांचे संपूर्ण कुटुंब होते. दुसऱ्या मजल्यावरील लोकं झोपेत असल्याने त्यांना घटनेची माहिती मिळाली नाही आणि त्यांचा जागेच मृत्यू झाला. नागरिकांनी त्यांचे दार वाजवले, आवाज दिला मात्र ते झोपेतेच असल्याने त्यांना वाचवण्यात अपयश आले.
पोलिसांची प्रतिक्रिया...
पोलीस अधिकारी यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, "मुख्य आगीचे कारण अद्याप आम्हाला समजू शकले नाही. तज्ञांना याबाबत माहिती देण्यात आली असून, त्यांच्याशी आम्ही चर्चा करत आहोत. आग लागण्याचे नेमकं कारण काय होते याची माहिती त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत सात लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. आगीचं नेमकं कारण आत्ताच सांगता येणार नाही मात्र तपास आमच्याकडून सुरू असल्याचे पोलीस अधिकारी यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग, एकाच घरातील 7 जणांचा मृत्यू