Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच रात्री दोन वेगवेगळ्या कंपनीचे एटीएम (ATM) फोडण्यात आले आहेत. एका एटीएममधून अंदाजे 22 लाख तर दुसऱ्या एटीएममधून अंदाजे 16 लाख असे एकूण अंदाजे 38 लाखांवर चोरट्यांनी डल्ला मारला होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच, पोलिसांकडून तपास केला जात आहे.


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील चापानेर आणि वैजापूरमध्ये दोन एटीएम फोडण्यात आल्याची घटना आज (17 जानेवारी) सकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही एटीएम एकाच रस्त्यावर आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार चापानेर येथील एसबीआय बँकेच्या एटीएममधून 22 लाख आणि वैजापूरच्या आयडीबीआय बँकेच्या एटीएममधून 16 लाख चोरीला गेल्याची माहिती आहे. या दोन्ही घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच, आरोपींना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.


सीसीटीव्हीवर ब्लॅक स्प्रे मारला...


कन्नड तालुक्यातील चापानेर आणि वैजापूरमध्ये एकाच रात्री दोन एटीएम फोडल्याने खळबळ उडाली आहे. हे दोन्ही एटीएम एकाच मार्गावर असल्याने, एकाच टोळीने हे चोरी केली असल्याचं बोललेलं जात आहे. विशेष म्हणजे एटीएममध्ये प्रवेश करताना चोरट्यांनी ओळख लपवण्यासाठी सुरुवातीला सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला. त्यानंतर आतमध्ये प्रवेश करत गॅस कटरने दोन्ही एटीएम कापले. दोन्ही एटीएममधून अंदाजे 38 लाख रुपये पळवल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच बँक अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. तर, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.


गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी...


कन्नड तालुक्यातील चापानेर आणि वैजापूरमध्ये एकाच रात्री दोन एटीएम फोडल्याची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या पथकाकडून दोन्ही घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. सोबतच परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी देखील केली जात आहे. तसेच, ठसेतज्ञ आणि श्वान पथकाला देखील बोलावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nylon Manja : जीवघेणा मांजा! नायलॉन मांजा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करा, न्यायालयाचे निर्देश