छत्रपती संभाजीनगर : राज्यात सर्वत्र दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात पतीने पत्नीची हत्या (Murder) केल्याच्या दोन घटना एकामागून एक समोर आल्याने खळबळ उडाली आहे. माहेराहून पैसे आणत नसल्याने पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील कापूसवडगाव येथे रविवारी समोर आली असतानाच, आता पैठणच्या हर्षी गावात देखील असाच काही प्रकार समोर आला आहे. दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी लाफ्याने मारहाण करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मयत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार पाचोड पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंका श्रीराम वाघ (वय 32 वर्ष) असे मयत महिलेचे नाव असून,  श्रीराम निवृत्ती वाघ असे आरोपी पतीचे नाव आहे. 


मयत महिलेच्या भावाने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रियंका आणि श्रीराम वाघ यांचे 2010 मध्ये रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. श्रीराम वाघ हा मिस्तरी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. त्यांना 13 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांचा मुलगा असे अपत्य आहे. मात्र, श्रीरामला दारू पिण्याचे व्यसन लागल्याने तो नेहमी दारूच्या नशेत असायचा. यामुळे तो सतत भांडण करून प्रियंकाला त्रास देत होता. याबाबत प्रियंकाने आपल्या भावाला देखील सांगितले होते. मात्र, भावाने आपल्या बहिणीची समजूत काढून, तिला समजवले होते. दरम्यान, 12 नोव्हेंबर रोजी श्रीराम पुन्हा रात्री साडेआठच्या सुमारास दारू पिऊन आला.  तसेच, शुल्लक कारणावरून प्रियंकासोबत वाद घालून भांडण करू लागला. तर, याचवेळी त्यांने घरातील लाकडी लाफा प्रियंकाच्या कपाळावर जोरात मारला. ज्यात प्रियंकाचा जागीच मृत्यू झाला. 


पत्नीला शासकीय रुग्णालयात घेऊन पोहचला...


प्रियंकाचा मारहाणीत जागीच मृत्यू झाल्यावर श्रीराम घाबरून गेला. आपल्यावर गुन्हा दाखल होईल याची त्याला भीती होती. त्यामुळे गावातील आपल्या एका नातेवाईकाला फोन करून, प्रियंकाने डोक्याला काहीतरी मारून घेतले असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे ते नातेवाईक श्रीरामच्या घरी पोहचले. यावेळी प्रियंका रक्ताच्या थोरळ्यात पडलेली होती. त्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने श्रीरामने पत्नीला पाचोड शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. 


पोलीस खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली...


दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी महिलेच्या डोक्याला मारहाण झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तिथे एक लाकडी लाफा पडलेला दिसला. त्यामुळे श्रीरामनेच पत्नीची हत्या केली असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने सुरवातीला उडवाउडवीचे उत्तर दिले. तसेच, प्रियंकाने स्वतः डोक्याला मारून घेतल्याच सांगू लागला. मात्र, पोलिसांनी पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


दिवाळीच्या दिवशीच पतीने पत्नीला संपवलं; संभाजीनगरमधील मन सुन्न करणारी घटना