छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) महाराष्ट्राचा दौरा करत असून, ठिकठिकाणी त्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. तर, आपल्या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील मनोज जरांगे यांच्या अशाच एका कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्नड शहरातील भारुका नगर येथील गिरणी ग्राऊंड झालेली सभा वेळेत झाली नसल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी संतोष त्र्यंबकराव निळ, संतोष नामदेव पवार, मनोज आण्णासाहेब देशमुख, राजेंद्र साहेबराव चव्हाण व बाळु आल्हाड पाटील, सदाशिव दगडू पाटील (सर्व रा. कन्नड ता कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सभेचा वेळ असतांना, ही सभा रात्री 12 वाजून 4 मिनिटाला सभा संपल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिलेल्या परवानगीचे व नियम अटींचे उल्लंघन, तसेच जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन करुन सभेच्या परीसरात राहणाऱ्या नागरी वसाहतीतील नागरिकांना उपद्रव होईल अशा प्रकारे ध्वनी क्षेपकाचा वापर केल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी अटी-शर्तींसह दिली होती परवनागी...
मनोज जरांगे यांच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्र दौरा सुरु आहे. दरम्यान, याचवेळी ते मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात देखील त्यांच्या सभा आयोजित करण्यात येत आहे. तर, 2 डिसेंबर रोजी त्यांची कन्नड शहरातील भारुका नगर येथील गिरणी ग्राऊंड सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे या सभेच्या परवानगीसाठी संतोष त्र्यंबकराव निळ, संतोष नामदेव पवार, मनोज आण्णासाहेब देशमुख, राजेंद्र साहेबराव चव्हाण व बाळु आल्हाड पाटील, सदाशिव दगडू पाटील (सर्व रा. कन्नड ता कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांकडे रीतसर अर्ज सादर केला होता. ज्यात, सभेची परवानगी व लाऊड स्पीकर लावण्याची परवानगी मिळावी अशी विनंती करण्यात आली होती. त्यामुळे 2 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत या सभेला काही अटीनुसार संतोष त्र्यंबकराव निळ यांचे नावाने परवानगी देण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत काय म्हटले आहे?
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या प्रशासकिय परवानगीनुसार संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेच्या दरम्यान सभा होणे अपेक्षित होती. मात्र, आयोजकांनी परवाना व अटी शर्तीचे उल्लंघन करुन रात्री 12 वाजून 4 मिनिटाला सभा संपविली. सभेच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी आयोजकांना परवानगीची वेळ लक्षात आणून दिली. तसेच, परवानगीचे व नियम अटींचे उल्लंघन होत असल्याचे देखील सांगितले. मात्र, पोलिसांनी समज देवुनही आयोजकांनी दिलेल्या परवानगीचे, निर्देशांचे उल्लंघन करुन, जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करुन, सभेच्या सभोवतालच्या परीसरात राहत असलेल्या नागरी वसाहतीतील नागरिकाना उपद्रव होईल अशा प्रकारे ध्वनी क्षेपकाचा वापर केला म्हणुन, गुन्हा दाखल करण्यात यावे असे फिर्यादीत म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
बॅनरवरील फोटो जाळला, गावात तणावाचे वातावरण; थेट जरांगेंचा फोन अन् परिस्थिती निवळली