छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या समाजाचे बॅनर फाडण्याचे किंवा जाळण्याचे प्रकार वाढले आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात देखील असाच काही प्रकार समोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी फोन करून गावकऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि त्यानंतर परिस्थिती निवळली. या प्रकरणी पोलिसांत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. 


अधिक माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गावात लावलेल्या बॅनरवरील मनोज जरांगे पाटलांचा फोटो जाळला होता. सकाळी ही बाब लक्षात येताच काही काळ गावात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तर, घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील गावात दाखल झाले होते. यावेळी आरोपींना अटक करण्याची मागणी करत गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच, परिसरातील मोठा जमाव घटनास्थळी दाखल झाला होता. शेवटी पीएसआय खाडे यांनी जरांगे पाटलांना फोन करून घडलेला प्रकार त्यांच्या कानी घातला. 


थेट मनोज जरांगे यांचा फोन...


मनोज जरांगे यांना कायगाव येथील घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ फोनवरून कायगाव परिसरातील सकल मराठा समाजाला शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच कायदा हातात न घेता कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही कृती न करण्याचे आवाहन केले. थेट जरांगे यांचा फोन आल्याने गावकऱ्यांनी एक पाऊल मागे घेत शांतता प्रस्तापित केली आणि परिस्थिती निवळली. त्यामुळे पोलिसांनी देखील सुटकेचा नि:श्वास सोडला. 


अटकेच्या मागणीसाठी पोलिसांना निवेदन


दरम्यान या प्रकरणी आळंदसह फुलंब्री तालुका सकल मराठा समाजबांधवांनी वडोदबाजार पोलिस ठाणे येथे व भोकरदन तालुक्यातील सकल मराठा समाजबांधवांतर्फे अज्ञात व्यक्तीला अटक करण्याची मागणी करत हसनाबाद पोलिसांकडे निवेदन देण्यात आले आहे.


मनोज जरांगे आज जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर...


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करत आहेत. सर्व मराठा बांधवांना एकत्रित आणण्यासाठी जरांगे पाटील राज्यभर हा दौरा करतायत. आज मनोज जरांगेंची जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यात रॅली असणार आहे. आज सकाळी 11 वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे. तसंच जरांगेंच्या स्वागतासाठी आयोजकांकडून जय्यत तयारी करण्यात आलीये. त्यानंतर दुपारी 1 वाजता मनोज जरांगे बुलढाण्यातील मलकापुरात स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता मनोज जरांगेची बुलढाण्यातील खामगावात सभा होणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट, मराठवाड्यात तब्बल एवढ्या कुणबी नोंदी सापडल्या