Aurangbad Crime News : औरंगाबाद (Aurangabad) शहरातील गुन्हेगारी काही थांबता थांबायला तयार नाही. त्यातच आता शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या (Firing) घटनेने हादरले आहे. उधारीचे साडेसात हजार रुपये मागितल्याने एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने तरुणाला भर रस्त्यात गोळ्या घालून त्याची हत्या केली आहे. शहरातील बायजीपुरा भागात ही घटना घडली असून, या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या गोळीबाराच्या घटनेत एक जण जखमी झाला आहे. हमद अब्दुल्लाह सालेह कुतुब चाऊस (वय 24 वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर, फय्याज पटेल (वय 27 वर्षे, रा. गल्ली क्रमांक 21, बायजीपुरा) असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. या घटनेत रस्त्याने जाणारा इरफान पठाण हा जखमी झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.


हल्लेखोर फयाज आणि मृत हमद एकमेकांच्या ओळखीचे होते. हमद हुसेन कॉलनीत आईसोबत राहत होता. तो पैठणगेटच्या कपड्याच्या दुकानात नोकरीला होता. 20 ऑगस्ट रोजी त्याचे लग्न असल्याने तो बुधवारी (9 ऑगस्ट) दुकानातून काम आटोपून लवकर घरी परतला. दरम्यान साडेसहा वाजता तो न्यू बायजीपुऱ्यात टेलरकडे गेला. टेलरला कपड्यांचं माप देण्यासाठी आला होता. त्यानंतर तो एका मित्रासोबत चहा पिऊन, जवळ असलेल्या मेडिकल समोर उभा राहिला होता. त्याचवेळी समोरुन आलेल्या फयाजने गावठी कट्ट्यातून थेट हमदवर गोळीबार केला. पहिली गोळी हमदच्या कानाजवळून गेली आणि मेडिकलवर मुलाला औषध घेण्यासाठी आलेल्या इरफान पठाण यांच्या हाताच्या आरपार गेली. त्यानंतर दुसरी गोळी फयाजने थेट हमदच्या छातीत घातली. ज्यात हमद जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.






11 दिवसांवर लग्न होते...


अवघ्या 7 हजार 500 रुपयांच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोळी मारल्यानंतर हल्लेखार फयाज पटेल पंधरा-वीस सेकंद मृताच्या मृतदेहास लाथाबुक्क्यांनी मारत होता. न्यू बायजीपुऱ्यातील इंदिरानगरमध्ये सायंकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. विशेष म्हणजे 11 दिवसांनंतर हमदचे लग्न होते. त्यासाठी तो तयारी करत होता. मात्र, या घटनेनंतर त्याचं सुखी संसाराचे स्वप्न भंगले आहे.


हल्लेखोर रेकॉर्डवरील गुन्हेगार


या घटनेतील आरोपी फय्याज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर चोरी, घरफोडी, लूटमारीसह दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. घरफोडीप्रकरणी त्याला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली होती. त्याचबरोबर कन्नड पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीचा माल जप्त केला होता. तसेच बायजीपुरा परिसरात तो स्वतःला मोठा गुंड असल्याचं भासवत होता. 


पोलिसांना खबर कशी लागत नाही?


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नशेखोर आणि गुंड असलेल्या फयाज ने महिनाभरापूर्वीच पिस्टल खरेदी केली होती. तसेच आपण पिस्टल आणली असून, लवकरच कुणावर तरी निशाणा लावणार असल्याचा सांगत होता. विशेष म्हणजे रेकॉर्डवरील एक गुन्हेगार उघडपणे आपल्याकडे पिस्टल असल्याचं सांगतोय आणि याची माहिती पोलिसांना लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मागील वीस दिवसातील ही तिसरी घटना आहे. औरंगाबाद शहरात सहजपणे गावठी कट्टे आणली जात आहे. मात्र, याची माहिती पोलीस विभागाला मिळत कशी नाही असा सवाल विचारला जात आहे.


हेही वाचा


Aurangabad Crime News : दहा रुपयाच्या वादावरून हत्या; खून केल्यावर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर