Aurangabad Suicide News : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ईसारवाडी गावात एक धक्कादायक घटना समोर आली असून, ठाकरे गटाच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसासाठी लावलेल्या बॅनरवरुन दोन गटात वाद झाला. तर वादाच्यावेळी अपमान झाल्याचे म्हणत एका 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (19 जुलै) रात्री हा प्रकार घडला असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मयत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महेश गोरक्षनाथ बोबडे ( वय 25 वर्षे, रा. ईसारवाडी, ता. पैठण) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. 


पोलिसांत देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, पैठण तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका नेत्याच्या वाढदिवसानिमित्त ईसारवाडी येथील महेश गोरक्षनाथ बोबडे हा तरुण आपल्या मित्रासोबत बुधवारी रात्री दहा वाजता गावात वाढदिवसाचे बॅनर लावत होता. या बॅनरवर राष्ट्रीय महापुरुषांचा फोटो छापलेला होता. या बॅनरवर महेश बोबडे याने पाय ठेवला म्हणून गावातील दहा ते बारा तरुणांनी महेश व त्याच्या घरच्या मंडळीला देखील मारहाण केली. घरातील संसारोपयोगी वस्तूंची नासधूस करण्यात आली. झालेल्या घटनेबाबत महेश बोबडे याला माफी मागण्यास भाग पाडून, या माफीनाम्याचा व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. दरम्यान बुधवारी गावातील एका व्यक्तीने मध्यस्थी करुन या प्रकरणावर पडदा पाडला. 


मात्र रात्री पुन्हा गावातील तरुण मारहाण करतील म्हणून महेश बोबडे शेतात झोपण्यासाठी गेला होता. सकाळ झाली तरी तो घरी न आल्याने त्याच्या भावाने शेताकडे जाऊन पाहिले असता महेशने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. सदरील घटनेची माहिती तात्काळ घरच्यांना देऊन पोलीस ठाण्यात कळवण्यात आले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. सकाळपासूनच गावामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. 


यांच्यावर गुन्हा दाखल... 


या बॅनरच्या वादातून आपल्याला व आपल्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केल्याचा अपमान झाल्यामुळे महेश बोबड याने शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याचे वडील गोरक्षनाथ गंगाधर बोबडे यांनी दाखल केली. या प्रकरणी सनी संदीप मिसाळ, सचिन जालिंदर शेळके, अनिकेत योसेफ ताकवले, यश विजय ससाणे, प्रदीप अण्णासाहेब मगरे, किरण अशोक महाले, तुषार संतोष ससाणे, गौरव रमेश ताकवले, ऋषीकेश मच्छिंद्र शेळके, स्वप्निल रमेश मिसाळ, सागर मिसाळ, अविनाश मिसाळ (सर्व रा. ईसारवाडी ता. पैठण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


गावात पोलिसांचा बंदोबस्त 


दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि नीलेश केळे, बिडकीन पोलीस ठाण्याचे गणेश सुराशे, पाचोड पोलीस ठाण्याचे संतोष माने, स्थानिक गुन्हा शाखेचे प्रदीप ठुबे यांच्यासह विविध पोलीस पथकाचा बंदोबस्त गावामध्ये मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. तर याप्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सपोनि नीलेश केळे हे करत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


'बाबा, मला माफ करा, मी तुमचे पैसे गमावले'; सुसाईड नोट लिहून कर्जबाजारी अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या