औरंगाबाद : जिल्ह्यातील दखलपात्र तसेच अदखलपात्र गुन्ह्यातील व्यक्तीविरुध्द करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाई अंतर्गत अशा व्यक्तीकडून चांगल्या वर्तणुकीचे विशिष्ट मुदतीचे अंतिम बंधपत्र घेण्यात येते. जेणेकरून या व्यक्तीकडून पुन्हा कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा घडणार नाही किंवा सामाजिक सलोख्यास बाधा पोहचणार नाही. परंतु, या स्वरुपाचे अंतिम बंधपत्राचे अटीचे भंग करून उल्लंघन केलेल्या व्यक्तींच्या विरूध्द आता पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया कठोर यांनी सक्त कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, अशाच एका गुन्हेगाराची थेट हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली असून, एकाला 15 हजारांचा दंड ठोठवण्यात आला आहे.
औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस ठाणे फुलंब्री हद्यीतील साजेद उर्फ गुड्डु जावेद शेख (वय 31 रा. राठी फुलंब्री रोड, धनगर गल्ली झोपडपट्टी फुलंब्री ता फुलंब्री जि औरंगाबाद) याचे वाढते गुन्हेगारी व धोकादायक कारवाईची गंभीर दखल घेऊन त्याचेविरुध्द कलम 110 (ई),(ग) सीआरपीसी प्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेच्या न्यायालयात प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली होती. यावेळी साजेद शेख याच्याकडून चांगले वर्तन ठेवून सार्वजनिक शांतता राखणे बाबत त्यांने हमी दिल्याने, त्याचेकडून दोन वर्षे कालावधीकरीता चांगल्या वर्तणुकीचा बंधपत्र कलम 117 क्रि.प्रो. कोड प्रमाणे अंतिम बंधपत्र (फायनल बॉंन्ड) घेण्यात आले होते.
दरम्यान, साजेद उर्फ गुड्डु जावेद शेख याचा बंधपत्राचा कालावधी संपण्याच्या आत दिनांक 20 मे रोजी काहिही कारण नसतांना त्यांने वानेगाव येथील एका सामान्य नागरिकास फोन कॉल करुन घराबाहेर बोलावून त्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. साजेदवर प्रतिबंधक कार्यवाही करुन ही त्याच्या वर्तनात कोणताही फरक पडला नाही. त्याच्या याच कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत त्याची रवानगी हर्सुल मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
अशांतता पसरविणाऱ्या कोणत्याही इसमांची गय केली जाणार नाही...
याचप्रमाणे, पोलीस ठाणे पिशोर हद्यीतील अशोक राजेंद्र हाडोळे (वय 21 वर्षे रा. करंजखेडा ता. कन्नड) याच्या विरुध्द पूर्वी दाखल गुन्ह्यात प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली होती. तसेच, दोन वर्षे कालावधीकरीता सार्वजनिक शांतता राखणे बाबत चांगल्या वर्तणुकीचे दिलेले बंधपत्राचे अटी व नियमांचे भंग केल्यामुळे त्यास 15 हजाराचा दंड ठोठावून दंडाची रक्कम वसुल करण्यात आली आहे. त्यामुळे, चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्राचे उल्लंघन करुन सामाजिक सलोखा, अगर अशांतता पसरविणाऱ्या कोणत्याही इसमांची गय केली जाणार नसुन, अशा व्यक्ती विरुध्द कठोर कायदेशिर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Aurangabad: आता भाऊ-दादांची खैर नाही, पोलिसांनी बनवली यादी; थेट घरात घुसून करणार कारवाई