Aurangabad News : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दोन मोठ्या घोटाळ्याने खळबळ उडाली आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात मराठवाड्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा तीस-तीस घोटाळा (Thirty Thirty Scam) समोर आला होता. दरम्यान आता 'आदर्श घोटाळा' (Adarsh Scam) समोर आला आहे. तीस-तीस घोटाळ्यात तब्बल साडेतीनशे कोटी पेक्षा अधिकची फसवणूक झाली होती. तर 'आदर्श घोटाळ्या'त 200 कोटींचा आकडा सुरवातीला समोर आला असून, ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही घोटाळ्यात औरंगाबादकरांना तब्बल साडेपाचशे कोटींचा चुना लागला आहे. 


काय आहे आदर्श घोटाळा? 


उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या लेखापरीक्षणात औरंगाबादच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत नियमबाह्य कर्जवाटप करण्यात आल्याचे समोर आले होते. ज्यात ओळखीतल्याच लोकांना, स्वतःच्याच इतर संस्थांना कोट्यवधींच्या कर्जाची खैरात वाटल्याचे देखील तपासातून समोर आले आहे. विशेष म्हणजे यात एकूण200 कोटींचा घोळ असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात शहरातील सिडको पोलीस ठाण्यात मंगळवारी (11 जुलै) रोजी मुख्य संचालक अंबादास आबाजी मानकापेसह अन्य मंडळ, कर्जदारांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर या पतसंस्थेतेच्या जिल्ह्यात 30 पेक्षा अधिक शाखा असून, त्यांची देखील चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे घोटाळ्याचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर अंबादास मानकापेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 


तीस-तीस घोटाळा कसा झाला? 


दरम्यान मागील वर्षे औरंगाबादचं तीस-तीस घोटाळा राज्यभरात गाजला होता.  समृद्धी महामार्ग आणि औरंगाबादमधील डीएमआयसी या प्रकल्पात हजारो शेतकऱ्यांची जमीन गेल्याने त्यांना ट्यवधी रुपयांचा मोबदला मिळाला होता. दरम्यान हेच लक्षात घेत औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील संतोष राठोड नावाच्या तरुणाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तीस-तीस योजनेत पैसे गुंतवण्यासाठी सांगितले. गुंतवलेल्या पैश्यांवर मासिक 30 टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले. सुरवातीला काही लोकांना परतावा देखील दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास बसला आणि गावच्या गाव त्यांच्या अमिषाला बळी पडले. पुढे तब्बल साडेतीनशे कोटी रुपये जमा करून संतोष राठोडने परतावा देणे बंद केले. त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. ज्यात पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या तो हर्सूल कारागृहात आहेत. 


नागरिकांनी काळजी घेण्याची गरज... 


मागील काही दिवसांत अधिकचा परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक होणाऱ्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पैश्यांची गुंतवणूक करतांना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांत अशा घटना वाढत आहे. वेगवेगळ्या योजनेतून दुप्पट-तिप्पट परतावा, शेअर मार्केटमधून मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवले जात आहे. त्यामुळे नागरीक अशा अमिषाला सहज बळी पडतात.


इतर महत्वाच्या बातम्या: 


औरंगाबादेतील 'आदर्श घोटाळ्या'चा पहिला बळी; पतसंस्थेतील 22 लाख रुपये बुडण्याच्या धास्तीने आत्महत्या