औरंगाबाद : उद्या मंत्री मंडळाची बैठक होणार असून, त्यापूर्वीच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज औरंगाबादच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला. पावसाने पाठ फिरवल्याने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची त्यांनी यावेळी पाहणी केली. तसेच झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. दरम्यान, शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा मांडल्या. त्यानंतर, “धीर सोडू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत, आता सरकारच्या मागे लागू.”असे आश्वासन आदित्य ठाकरेंनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.


या पाहणी दौऱ्यात आदित्य यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना म्हंटले की, “शेतकऱ्यांची भावना तीव्र आहेत. यंदा उशिरा पाऊस झाला, त्यात मागच्या वर्षी ओला दुष्काळ होता. अशा परिस्थितीत कोणालाही एक रुपयाची मदत झालेली नाही. विधानभवनात आणि बाहेर सत्ताधाऱ्यांकडून ज्या घोषणा केल्या जातात, त्याचं मग काय होते. ज्याप्रमाणे 40 गद्दारांना आमिष दाखवून आपल्याकडे खेचण्यात आले अशीच आमिषे दाखवली जाणार आहे का?, सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. आधीचे कृषिमंत्री देखील कधी बांधावर दिसले नाहीत, स्वतःच्या मतदारसंघात देखील ते बांधावर गेले नाहीत. आता आत्ताचे कृषिमंत्री उद्या येतील औरंगाबादमध्ये आणि फक्त घोषणा करतील. पण कृषिमंत्री बांधावर येणार आहेत का? आणि बांधावर आल्यास शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे का? असे आदित्य ठाकरे म्हणाले.


शेतकरी आहोत हाच गुन्हा...


महाराष्ट्रातील शासन बिल्डर आणि कंत्राटदार यांचं झालं आहे. कदाचित त्यांचे आवडते उद्योगपती, बिल्डर आणि कंत्राटदार यांच्या डोक्यावर कर्ज असते तर त्यांनी माफ केले असते. पण शेतकऱ्यांचं शेतकरी असनेच गुन्हा ठरत असून, त्यांचे कर्ज माफ केले जात नाही. शेतकरी बिल्डर आणि उद्योगपती नसल्याने त्यांना कर्जमाफी मिळत नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.


असा आहे आदित्य ठाकरेंची दौरा...


पहिला दिवस (15 सप्टेंबर)



  • औरंगाबाद तालुक्यातील निपाणी येथे सकाळी 11.30 वाजता पाहणी दौरा

  • पैठण तालुक्यातील लोहगांव येथे दुपारी 12.45 वाजता पाहणी दौरा

  • गंगापुर तालुक्यातील गुरुधानोरा येथे दुपारी 1.30 वाजता पाहणी दौरा

  • वैजापूर मतदार संघातील मुद्देशवाडगांव येथील शेतकऱ्यांसमवेत दुपारी 2.30 वाजता संवाद साधणार.


दुसरा दिवस (16 सप्टेंबर)



  • नाशिकच्या निफाड तालुक्यातील भेंडाळी गावातील नुकसानग्रस्त भागाची 11.30 वाजता पाहणी

  • सिन्नर तालुक्यातील वंडागळी 12.30 वाजता नुकसानग्रस्त भागाची पाहणी

  • इगतपुरी तालुक्यातील साकुर गावात नुकसानग्रस्त भागाची पाहणी आणि शेतकरी संवाद


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aaditya Thackeray : आजपासून आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, दुष्काळग्रस्त भागाची करणार पाहणी; वाचा कसा असेल दौरा