Chhatrapati Sambhaji Nagar Accident : बुलढाणा (Buldhana) येथे शनिवारी बसचा अपघात होऊन 25 जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. दरम्यान एकीकडे या अपघाताची चर्चा सुरु असतानाच अचानक छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातून काळजाचा ठोका चुकवणारी बातमी येऊन धडकली आणि यंत्रणेची पळापळ सुरु झाली. छत्रपती संभाजीनगर इथून नंदूरबारकडे निघालेली राज्य परिवहन महामंडळाची बस वेरुळ घाटात घसरली. शनिवारी सकाळी 11 वाजता घडलेल्या या घटनेत सुदैवाने 24 प्रवाशी बालंबाल बचावले. मात्र या अपघातात बसचालक गंभीर जखमी झाला आहे. राहुल चव्हाण असे या अपघातात जखमी झालेल्या बसचालकाचे नाव आहे. 


दरम्यान या अपघाताविषयी एसटी बस (ST Bus) वाहक राहुल चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगर-नंदुरबार बस (एमएच 14 बीटी 2367) निघाली. ही बस वेरुळ घाट उतरत असताना 11 वाजेच्या सुमारास ओल्या, तेलकट रस्त्यावरुन खाली घसरली. यात बसचालक राहुल चव्हाण हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर इथे पाठवण्यात आले. या बसमधील 24 प्रवाशांना मात्र दुखापत झालेली नाही. त्यांना दुसऱ्या बसमधून चाळीसगावपर्यंत पाठवण्यात आले.


पोलिसांची धावपळ...


शनिवारी बुलढाणा येथे मध्यरात्री बसचा अपघात झाल्याने 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान पहाटेपासून माध्यमांमध्ये याबाबत बातम्या सुरु होत्या. सर्व राज्याचे लक्ष या घटनेकडे होते. दरम्यान याचवेळी खुलताबाद पोलिसांना फोन आला की, वेरुळ घाटात बस घसरली आहे. तसेच यात मोठ्याप्रमाणात प्रवासी देखील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांनी आपल्या पथकासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत सुदैवाने 24 प्रवाशी बालंबाल बचावल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. 


केमिकलयुक्त डांबरामुळे वाहने घसरत असल्याची चर्चा


खुलताबाद ते सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण करताना मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त डांबर वापरण्यात आले. या केमिकलमुळे महामार्ग चोपडा बनला आहे. पावसात त्यावरुन वाहने घसरत आहेत, अपघात घडत असल्याची चर्चा अपघातस्थळी ऐकावयास मिळाली. सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा राष्ट्रीय महामार्ग विभागाने ही समस्या सोडवावी अशी मागणी प्रवाशांतून, वाहनचालकांतून जोर धरत आहे. 


दौलताबाद घाटात दोन तास वाहतूक कोंडी 


शनिवार असल्याने छत्रपती संभाजीनगरहून मोठ्या संख्येने भाविक भद्रा मारोती दर्शनाला जातात. तसेच तसेच ईदच्या दुसऱ्या दिवशी मुस्लीम बांधव हे खुलताबाद येथील दर्गा येथे जातात. त्यातच पावसाळा सुरु झाल्याने वेरुळ म्हैसमाळ, सुलिभंजन दर्शनासाठी जाणाऱ्यांमुळे पर्यटक व भाविकांची संख्या जास्त असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ होती. मात्र, दुपारी तीन वाजता वाहतूक ठप्प झाली. पाच वाजेपर्यंत शेकडो वाहनांच्या दोन्ही बाजूंनी रांगा लागल्या होत्या. तर स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी परिश्रम घेऊन वाहतूक सुरळीत केली.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Buldhana Accident : 'संकटकाळाची खिडकी कुठे आहे?' बुलढाण्यातील भीषण अपघातानंतर सोशल मीडियाच्या पोस्टने वेधलं लक्ष