छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड येथे आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिल्याचे प्रकरण समोर आल्याने मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. विशेष म्हणजे यावेळी अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आता या सर्व प्रकरणावर खुद्द अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया आली असून, सत्तार यांनी 'कोणाचे मन दुखावले असेल तर मी खेद व्यक्त करतो' असे म्हटले आहेत. 


दरम्यान यावर बोलतांना सत्तार म्हणाले की, "बुधवारी संध्याकाळी सिल्लोड शहरामध्ये गौतमी पाटील यांच्या लावणीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात 60 ते 65 हजार लोकांची उपस्थिती होती. अशावेळी विरोधी पक्षातील लोकांनी काही हुल्लडबाज लोकांना पाठवून कार्यक्रम अयशस्वी व्हावा आणि कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्यासाठी पाठवले होते. तसेच हा कार्यक्रम उधळून लावण्याचा काही लोकांचा कट होता. अशा लोकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आमच्या ग्रामीण भागातील बोलीत, शब्दात मी बोललो. यामुळे कुणाच्या मनात शंका-कुशंका निर्माण झाली असेल तर, निश्चितपणे मी दिलगिरी व्यक्त करतो," असे सत्तार म्हणाले आहेत. 


मी काही शब्दांचा वापर केला.


पुढे बोलतांना सत्तार म्हणाले की, "कार्यक्रमाच्या ठिकाणी 20 हजार महिला होत्या. लहान मुलं होते. एकूण 60 ते 65 हजार लोकांची गर्दी होती. त्यामुळे अशा परिस्थितीत विरोधी पक्षातील लोकांनी जी काही हुल्लडबाजी केली, ती यापुढे भविष्यात करू नयेत अशी माझी विनंती आहे. कारण आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम संपूर्ण सिल्लोड शहराचा होता. कार्यक्रमासाठी आलेल्या महिला, मुलं सुरक्षित घरी जावेत आणि कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी मी काही शब्दांचा वापर केला. मात्र, परिस्थिती तशी असल्याने मला ते बोलावं लागलं. यामुळे 'कोणाचे मन दुखावले असेल तर मी खेद व्यक्त करतो" असेही सत्तार म्हणाले.


नेमकं काय घडलं? 


मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सिल्लोड येथे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र, कार्यक्रम सुरू झाल्यानंतर समोर बसलेल्या काही तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली. त्यामुळे कार्यक्रम थांबवावा लागला. त्यामुळे संतापलेल्या अब्दुल सत्तार माईक घेऊन थेट स्टेजवर पोहचले. त्यांनी पोलिसांना उलटबाजी करणाऱ्या तरुणांना आवर घालण्याच्या सूचना दिल्या. मात्र तरुण काही ऐकायला तयार नव्हते. मग काय सत्तार यांचा पारा आणखीनच चढला. सत्तार यांनी पोलिसांना थेट लाठीचार्ज करून उलटबाजी करणाऱ्या तरुणांना जेलमध्ये टाकण्याचे सूचना दिल्या. सत्तार यांनी आदेश देताच बंदोबस्तसाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी थेट समोर बसलेल्या लोकांवर लाठीच्या सुरू केला. पोलिसांकडून लाठीमार होताच एकच धावपळ उडाली. दिसेल त्याला पोलीस लाठ्याने मारत होते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


कधी शिवीगाळ, कधी कार्यकर्त्याला मारहाण, तर कधी घोटाळ्याचे आरोप; वादग्रस्त भूमिकांमुळे चर्चेत राहणारे अब्दुल सत्तार