Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation) शहरातील व्यापाऱ्यांकडून आस्थापना कर वसुली करण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त केली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या या निर्णयाला व्यापाऱ्यांकडून कडाडून विरोध होत आहे. तर महापालिकेने आस्थापना कराचा निर्णय रद्द केला नाही, तर तब्बल 50  हजार व्यापारी रस्त्यावर उतरतील असा इशारा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. 


शहरातील लहान-मोठे सर्वच व्यापारी अनेक वर्षांपासून शासनाचा शॉप अॅक्ट आणि महापालिकेकडून व्यावसायिक कर भरतात. असे असताना मनपा प्रशासन केवळ स्वतःची तिजोरी भरण्यासाठी व्यापाऱ्यांवर आस्थापना कराचा बोझा टाकत असल्याचा आरोप करत व्यापारी महासंघाने या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तत्पूर्वी सामंजस्याने हा प्रश्र निकाली काढण्यासाठी व्यापाऱ्यांनी स्थानिक आमदार-खासदार, पालकमंत्री यांच्यासह थेट मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलेले आहे. तर त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय येण्याची व्यापाऱ्यांना आशा आहे. पण असे न झाल्यास शहरातील तब्बल 50  हजार व्यापारी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. 


शिष्टमंडळ लोकप्रतिनिधी यांची भेट घेणार...


पालिका प्रशासनाने घाई करत आस्थापना कर वसुली प्रक्रियेला गती दिल्याने व्यापारी एकवटले आहे. गरज पडल्यास शहरातील लहान-मोठे पन्नास हजार दुकानदार रस्त्यावर उतरून मनपाच्या विरोधात आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी एक शिष्टमंडळ पालकमंत्री, सहकारमंत्री, विरोधी पक्षनेते, आमदार, खासदारांची पुन्हा एकदा भेट घेणार आहे. महानगरपालिकेने घेतलेला निर्णय चुकीचा असून, तो मागे घेण्यासाठी पुढाकार घेण्याची त्यांच्याकडे विनंती करणार आहे. तसेच मनपाने हा निर्णय रद्द करावा अशी सर्व व्यापाऱ्यांची मागणी आहे, असा जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय काकरिया यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. 


अन्यथा 50 हजार व्यापारी रस्त्यावर उतरील 


तर व्यापारी नियमानुसार शॉप अॅक्ट, व्यावसायिक कर भरत असताना मनपाकडून आस्थापना कर लादला जात आहे. यासाठी लोकप्रतिनिधींना पुन्हा एकदा निवेदन देणार आहोत. जर मनपाने निर्णय रद्द केला नाही तर 50 हजार व्यापारी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी आहे, असा इशारा जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण राठी यांनी दिला आहे. त्यामुळे आता महानगरपालिका प्रशासन यावर काय निर्णय घेणार आणि लोकप्रतिनिधी यांची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


ओबीसीतून आरक्षण द्या, अन्यथा तेलंगणात जाण्याची परवानगी द्या; संभाजीनगरात सकल मराठा समाजाचे आंदोलन