Chandrapur Gram Panchayat Election Results : नुकत्यात चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur District) झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल हा विद्यमान लोकप्रतिनिधींची समीकरणे बदलवणारा असून निकाल लोकप्रतिनिधींची धाकधूक वाढवणारा लागला आहे. मतदारांनी जाहीर केलेल्या निकालपत्रकात काही लोकप्रतिनिधी आपापल्या क्षेत्रात पास झाले. तर, काही नापास झाले आहेत. 


जिल्ह्यातील 59 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत सदस्यांसोबतच सरपंचही थेट जनतेतून निवडण्यात आले. निवडणूक राजकीय पक्षाच्या अधिकृत चिन्हावर होत नसली, तरी प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असतात. गावपातळीवरील कार्यकर्त्यांना समोर करून आपल्या पक्षाच्या विचाराच्या माणसांना रिंगणात उतरवितात. त्यानंतर सुजान मतदार लोकप्रतिनिधींच्या कामाची पावती म्हणून त्यांच्या पॅनेलच्या उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ घालत असतात.


या निवडणुकीतील मतदारांचा मूड हा विद्यमान लोकप्रतिनिधींना पुढील निवडणुकीची मोर्चेबांधणी करणे सोयीचे ठरत असते. कॉंग्रसचे आमदार सुभाष धोटे यांच्या राजुरा मतदारसंघात 17 ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. कोरपना तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीपैकी 09 ग्रामपंचायतींवर शेतकरी संघटना-भाजप युतीचा, तर कवठाळा या ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीचा सरपंच निवडून आल्याचा दावा करण्यात आला आहे. राजुरा तालुक्यातील चारपैकी 3 ग्रामपंचायतीवर कॉंग्रेस, 1 ग्रामपंचायतीवर भाजप समर्थित उमेदवार विजयी झाला. जिवती तालुक्यात भाजप-गोंडवाना गणतंत्र पक्षाला 2, शेतकरी संघटनेचा 1 ठिकाणी सरपंच विजयी झाला आहे.


प्रत्येक पक्षाचे उघडले खाते...


राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांच्या मतदारसंघातील मूल तालुक्यात सातपैकी चार ग्रामपंचायतींमध्ये कॉंग्रेस (Congress), तर तीन ठिकाणी भाजपचा सरपंच विजयी झाला. बल्लारपूर तालुक्यात भाजप आणि कॉंग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी दोन सरपंच (Sarpanch) आले. पोंभुर्णा तालुक्यात कॉंग्रेस आणि भाजप या दोघांनाही प्रत्येकी एक सरपंच मिळाला आहे. एका ठिकाणी अपक्षाने बाजी मारली. चंद्रपूर विधानसभेतील पाच ग्रामपंचायतीमध्ये भाजप, कॉंग्रेस, गोंडवाना गणतंत्र पक्ष आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांना प्रत्येकी एका  ग्रामपंचायतीमध्ये सरपंच मिळाले. एका ठिकाणी महाविकास आघाडीचा सरपंच पदाचा उमेदवार विजयी झाला. माजी पालकमंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभेचे विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरीत मतदारसंघात सहा ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली. सिंदेवाही तालुक्यात भाजप दोन, कॉंग्रेस समर्थित उमेदवार एका ठिकाणी विजयी झाला. ब्रह्मपुरीत तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत कॉंग्रेसच्या ताब्यात आली. 


चिमूरमध्ये पाचपैका चारवर कॉंग्रेसचे सरपंच


सावली तालुक्यातील दोन ग्रामपंचायती भाजप आणि एका ठिकाणी कॉंग्रेसचा सरपंच विजयी झाला. चिमूर विधानसभा मतदारसंघात नागभीड तालुक्यात पाचपैकी चार कॉंग्रेस, तर एका ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच विजयी झाले. चिमूर तालुक्यातसुद्धा प्रत्येकी दोन ग्रामपंचायत कॉंग्रेस आणि भाजपचा सरपंच निवडून आला, तर एका ग्रामपंचायतीवर अपक्षाने बाजी मारली. कॉंग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या वरोरा-भद्रावती मतदार संघात आठ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित पॅनेलने विजय प्राप्त केला आहे. एकंदरित, जिल्ह्याच्या 15 तालुक्यांतील 59 गावांतील मतदारांनी दिलेला कल हा जिल्ह्यातील सर्वच विद्यमान लोकप्रतिनिधींना येत्या काळात विकासकामांच्या माध्यमातून जोरदार कमबॅक करावे. अन्यथा अडीच वर्षांनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चांगली दमछाक झाल्याशिवाय राहणार नाही, असा सूचक इशाराच दिला आहे.


ही बातमी देखील वाचा


GMC Nagpur : व्हेंटिलेटरअभावी आई-वडिलांसमोरच मुलीचा मृत्यू होणं हे दुर्दैव, सरकारी रुग्णालयांमध्ये पुरेसे व्हेंटिलेटर उपलब्ध करावेत : अजित पवार