Continues below advertisement

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निकालांमध्ये भाजप मोठा पक्ष ठरला असला तरी विदर्भात भाजपच्या निराशाजनक कामगिरीवरून माजी मंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारां(Sudhir Mungantiwar) नी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांपैकी 7 नगरपरिषदांवर काँग्रेसनं नगराध्यक्षपद खेचून आणलं. त्यावरुनच चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या हाराकिरीमुळे पारा चढलेल्या मुनगंटीवारांनी, थेट पक्ष नेतृत्वावरच संताप व्यक्त केला. पक्ष नेतृत्वाने गटबाजीला पोषक वातावरण निर्माण केल्याचा आरोप मुनगंटीवारानी केला.

राज्यामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं असलं तरी चंद्रपूरमध्ये मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं. या ठिकाणी भाजपला अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदियाला मंत्रिपद दिलं नाही, त्यामुळे विकासाच्या बाबतील लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्याचं मत मुनगंटीवारांनी मांडलं.

Continues below advertisement

Sudhir Mungantiwar On Devendra Fadnavis : पक्षनेतृत्वाने गटबाजीला चालना दिली

चंद्रपुरातील झालेल्या पराभवानंतर सुधीर मुनगंटीवारांनी थेट पक्षनेतृत्वावरच हल्ला केला. ते म्हणाले की, चंद्रपूर हा जिल्हा भारतीय जनता पक्षाला मोठं यश देणारा जिल्हा होता. आता मात्र मतदारांनी पाठिंबा दिला नाही. या दोन वर्षांमध्ये अनेक गोष्टी घडत गेल्या. गटबाजीला पोषक वातावरण झालं. त्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली.

भाजपमध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशाच्या संदर्भात सुधीर मुनगंटीवारांनी एक वक्तव्य केलं होतं. शनिशिंगणापूर प्रमाणे पक्षाचे दरवाजे सर्वांना उघडे ठेवले जातात असं ते म्हणाले होते. त्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की," नवीन लोकांना पक्षप्रवेश देताना पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना विचारलं जात नाही किंवा जिल्ह्यातल्या नेत्यांना विचारलं जात नाही. मग अशा लोकांना पक्षात घेऊन नवीन गट तयार केले जातात. त्यामुळे पक्षाने विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजेत. संघाच्या विचारांना विरोध करणारे जर पक्ष नेतृत्वाच्या मांडीला मांडी लावून बसणार असतील तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात शंका उपस्थित होऊ शकते."

Sudhir Mungantiwar On Chandrapur Election : पक्षाने जबाबदारी दिली नाही

चंद्रपुरात भाजपच्या झालेल्या पिछेहाटीवर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपुरात माझं आता कुठे नेतृत्व आहे? मी आता मंत्री नाही आणि पक्षाने मला कोणतीही जबाबदारी दिली नव्हती. ज्यांनी निर्णय घेतला असेल त्यांनी समजून घेतलं पाहिजे. पक्षात निर्णय कोण घेतोय हे समजायला मार्ग नाही.

Sudhir Mungantiwar On Result : मंत्रिपद नसल्याने मतदारांमध्ये नाराजी

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदियामध्ये या आधी मोठ्या प्रमाणात विजय प्राप्त केला जायचा. पण या चारही जिल्ह्यामध्ये पक्षाने कोणतेही प्रतिनिधीत्व देण्यात आलं नाही.काही जिल्ह्यांमध्ये चार-चार मंत्रिपदं देण्यात आली, पण या चार जिल्ह्यांमध्ये मात्र कुणालाही मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे या ठिकाणाचा विकास होऊ शकेल की नाही अशी शंका मतदारांच्या मनात आला असेल."

ही बातमी वाचा: