Continues below advertisement

चंद्रपूर : राज्यभरात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीचा गाजावाजा असताना चंद्रपूरमध्ये (Chandrapur Election Result) मात्र भाजपला मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं. चंद्रपुरातील 11 पैकी आठ ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत, तर भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. या पराभवानंतर पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मात्र थेट पक्षाच्या नेतृत्वावर टीका केली. काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली, तर आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली असं वक्तव्य मुनगंटीवारांनी केलं. त्यामुळे मुनगंटीवारांनी नाव न घेता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधल्याचं दिसून आलं.

विदर्भातील 100 नगरपरिषद आणि नगरपंचायतींपैकी तब्बल 55 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात 27 पैकी 22 नगरपालिकेवर भाजपनं झेंडा फडकवला आहे. चंद्रपूरमध्ये मात्र भाजपला केवळ दोनच ठिकाणी विजय मिळवता आला आहे. त्यानंतर मुनगंटीवारांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली.

Continues below advertisement

Sudhir Mungantiwar On Devendra Fadnavis : माझी शक्ती कमी केली, मुनगंटीवारांचे वक्तव्य

चंद्रपुरात झालेल्या पराभवावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "आम्ही हा पराभव नम्रतापूर्वक स्वीकारतो. विजय झाल्यावर माजायचं नाही, पराभव झाल्यावर लाजायचं नाही. काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली. चंद्रपूरमध्ये गटबाजीला पोषक वातावरण निर्माण व्हावं असं आमच्या पक्षाचं धोरण दिसतं. त्यातून मग 11 नगरपालिकांमध्ये गटबाजी अनुभवली आहे.

Sudhir Mungantiwar On Result : पक्षप्रवेश घेताना नेत्यांना विचारलं जात नाही

शनिशिंगणापूर नंतर आमचा एकमेव पक्ष आहे ज्याचे दरवाजे इतरांसाठी कायम खुले असतात, त्यामुळे कुणीही पक्षात येतो असा टोलाही मुनगंटीवारांनी लगावला. पक्षात प्रवेश देताना जिल्हा अध्यक्षांना किंवा जिल्ह्यातील नेत्यांना विचारलं जात नाही, कुणालाही प्रवेश दिला जातो. तसेच बाहेरच्या लोकांना पक्षात प्रवेश देऊन नवीन गट निर्माण केले जात असल्याची टीका सुधीर मुनगंटीवारांनी केली. 

चंद्रपुरातील पराभवाबद्दल वक्तव्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, सुधीरभाऊ कुठे कमी पडले असतील तर त्यांना ताकद देऊ आणि चंद्रपूरची महापालिका जिंकू. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरही मुनगंटीवारांनी प्रतिक्रिया दिली. म्हणण्यामध्ये आणि देण्यामध्ये अंतर आहे असा टोला मुनगंटीवारांनी लगावला.

Chandrapur Politics : मंत्रिपद नसल्यामुळे लोकांना शंका

चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या चारही जिल्ह्यांमध्ये भाजपकडून एकही मंत्रिपद देण्यात आलं नाही. त्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहे आणि त्यातूनच भाजपच्या विरोधात मतदान केलं जात असल्याचं मत मुनगंटीवारांनी व्यक्त केलं. 

ही बातमी वाचा: