Tadoba Tiger Reserve Vidarbha : गुरुवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने पर्यटक मोठ्या संख्येत ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आले होते. त्यापैकी काहींनी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. या धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांची मस्ती वनपथकाने जिरवली असून त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. शिवाय त्यांना लगेच बफर क्षेत्राबाहेर पाठवण्यात आले.


प्राप्त माहितीनुसार काल गणराज्य दिनानिमित्त सुट्टी असल्याने ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची मोठी गर्दी होती. अशाच काही पर्यटकांनी मोहर्ली- पद्मपुर मार्गावर भर जंगलात गाडीखाली उतरून वाहनातील म्युझिक सिस्टीम वाजवत धिंगाणा केला. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात मोठमोठ्याने गाणे वाजवून, वाहनाखाली उतरून धिंगाणा घालण्यासही सुरुवात केली. हा प्रकार परिसरात असलेल्या वनपालाच्या लक्षात आला. त्यांनी लगेच या घटनेची माहिती वनपथकाला दिली. वनपथकाला बघताच सुरुवातीला या पर्यटकांनी वाद घालण्याच्या प्रयत्न केला. मात्र नंतर कायदा आणि नियमांबद्दल बोलण्यास पथकाने सुरुवात केल्याबरोबर पर्यटकांची बोलती बंद झाली आणि त्यांनी दंड भरला.


दंड ठोठावून प्रश्न सुटणार?


ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मोहर्ली पद्मापुर मार्गाने जाताना दोन चारचाकी वाहने ताडोबा बफर सफरीच्या रस्त्यावर थांबली. त्यातील पर्यटक खाली उतरून मोठ्या आवाजात गाणी लावून पार्टी करत असल्याचे स्थानिक पर्यटक मार्गदर्शक व जिप्सी चालकाच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने मोहर्ली वनपरिक्षेत्र कार्यालयात माहिती दिली. ,वनविभागाची चमू तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. ज्या परिसरात भर दिवसा वाघ रस्त्याने चालताना दिसतो, आशा संवेदनशील परिसरात वाहनाखाली उतरून मोठमोठ्याने गाणी वाजवून पार्टी करणे म्हणजे वाघाच्या तोंडी आयता घास देण्यासारखे आहे. या घटनेत वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी बाहेरच्या राज्यातून आलेल्या या वाहनचालकाकडून पाच हजार रुपये दंड आकारला व त्यांना जंगलाबाहेर काढण्यात आले. मात्र, दंड आकारून हा प्रश्न सुटणार का, असा प्रश्न वन्यजीव प्रेमींनी उपस्थित केला. या घटनेने ताडोबातील अनियंत्रित पर्यटनावर प्रशासनाची पकड ढिली झाल्याचे दिसून आले.


म्हणे नियमांची माहिती नाही...


ज्या ठिकाणी या पर्यटकांचा धिंगाणा सुरू होता, त्या भागात वाघाचे वास्तव्य असून, अनेकदा रस्ता ओलांडताना पर्यटकांनी बघितले आहे. अशा संवेदनशील ठिकाणी या पर्यटकांनी नियमभंग करीत धिंगाणा केला. शिवाय त्यांना लगेच बफर क्षेत्राबाहेर पाठवण्यात आले. हे पर्यटक परराज्यातील असल्याने नियमांची त्यांना माहिती नव्हती. त्यामुळे दंड ठोकून त्यांना समज देऊन सोडण्यात आले.


ही बातमी देखील वाचा...


महेश मांजरेकरांवर गुन्हे दाखल करा; नागपुरात लहू सेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन