Chandrapur News : पोलीस दलात (Police Force) बदली होणं ही काही नवीन गोष्ट नाही. अपेक्षित ठिकाणी बदली (Transfer) झाल्याने आनंद होतो पण बदलीमुळे नाराज होणार अधिकाऱ्यांची संख्याही कमी नाही. परंतु हे अधिकारी निर्णय स्वीकारतात आणि ज्या ठिकाणी बदली झाली आहे, तिथे रुजू होतात. मात्र चंद्रपुरात (Chandrapur) बदलीमुळे नाराज झालेल्या एका पोलीस निरीक्षकाने (Police Inspector) चक्क आपल्या कार्यालयातील टॉयलेटचे दार, खुर्ची टेबल, एसी, पदडे आणि दिवे काढून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आपली नाराजी दर्शवण्यासाठी या पोलीस निरीक्षकाने केलेल्या कृत्याने चंद्रपूर पोलीस (Chandrapur Police) दलात सगळेच आश्चर्य व्यक्त करत आहेत. 


स्थानिक गुन्हे शाखेतून मानव संसाधन विभागात बदली


बाळासाहेब खाडे असं या पोलीस निरीक्षकाचं नाव असून ते चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. बाळासाहेब खाडे यांची गुरुवारी (9 फेब्रुवारी) स्थानिक गुन्हे शाखेतून मानव संसाधन विभागात बदली झाली. परंतु त्यांना हा निर्णय रुचला नाही. या बदलीने नाराज होत त्यांनी तातडीने शुक्रवारी (10 फेब्रुवारी) स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात येत  टॉयलेटचे दार, खुर्ची-टेबल, एसी, पदडे आणि दिवे या सर्व वस्तू काढून नेल्या. 


पोलीस निरीक्षकाच्या कृत्यामुळे पोलीस विभागात खळबळ


बाळासाहेब खाडे यांचा स्थानिक गुन्हे शाखेत 2 वर्ष 3 महिन्याच्या कार्यकाळ पूर्ण झाला होता. पोलीस अधीक्षकांनी गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील 34 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात बाळासाहेब खाडे यांची मानव संसाधन विभागाच बदली करण्यात आली. मात्र बदलीनंतर बाळासाहेब खाडे यांनी केलेल्या या कृत्यामुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. 


बदनामी होऊ नये म्हणून डागडुजीला सुरुवात


दरम्यान नवीन आलेल्या पोलीस निरीक्षकांमुळे पोलीस दलाची बदनामी होऊ नये म्हणून तातडीने पोलीस निरीक्षकाच्या कार्यालयाच्या डागडुजीला सुरुवात केली. या प्रकरणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे माजी पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनीही बोलण्यास नकार दिला आहे.


बीडमध्ये कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याला निरोप देताना गावकरी आणि कर्मचारी भावूक


एकीकडे बदली झालेल्या पोलिसाच्या कृत्यामुळे सगळेच धक्क्यात असताना काही दिवसांपूर्वी बीडमध्ये एका पोलीस निरीक्षकाला बदलीनंतर निरोप देताना कर्मचाऱ्यांसह गावकरी भावूक झाल्याचं दिसलं. बीडच्या परळी तालुक्यातील शिरसाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांची बदली झाली. प्रदीप एकशिंगे यांनी शिरसाळा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना गुन्हेगारी रोखण्यासाठी मोलाची कामगिरी केली होती. त्यामुळे नागरिकांनी इतर कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या आपुलकीचे संबंध निर्माण झाले होते.आता त्यांची बदली झाल्यानंतर कर्मचारी आणि गावकऱ्यांनी त्यांचा निरोप समारंभाच्या कार्यक्रमात त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांना निरोप दिला आहे.