Sudhir Mungantiwar : राज्यातील एकमेव कृषी तंत्रज्ञान उद्यान (Agricultural Technology Park) चंद्रपुरात (Chandrapur) उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे. धनोजे कुणबी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी मुनगंटीवार बोलत होते. यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील अजयपूर इथं दहा एकर जागेवर हे उद्यान उभारण्यात येणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 


शेतकऱ्यांना शेतीसंबंधित नवनवीन माहिती कायमस्वरूपी मिळणारे  राज्यातील एकमेव कृषी तंत्रज्ञान उद्यान चंद्रपुरात उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अजयपूर या ठिकाणी दहा एकर जागेवर हे उद्यान उभारण्यात येणार आहे. आतापर्यंत देशात हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये अशा प्रकारची उद्यानं उभारण्यात आली असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. या उद्यानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती संबंधित नवनवीन आणि आधुनिक गोष्टींची माहिती स्थायी आणि कायमस्वरूपी असलेल्या या केंद्राच्या माध्यमातून मिळू शकणार आहे.


Sudhir Mungantiwar on Baramati : बारामतीच्या पुढे चंद्रपूर राहिलं पाहिजे


कृषी तंत्रज्ञानात बारामतीच्या पुढे चंद्रपूर राहिलं पाहिजे असेही सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले. चार दिवसाच्या कृषी प्रदर्शनात अनेकवेळा शेतकरी उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळं आपण जर चंद्रपूर जिल्ह्यात कायमस्वरूपी कृषी तंत्रज्ञान उद्यान सुरु केलं तर त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ज्यावेळी शेतकऱ्याला वेळ असेल, त्यावेळी ते इथे येऊन शेती संदर्भातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊ शकतील असे मुनगंटीवार म्हणाले. या नवीन कृषी तंत्रज्ञान उद्यानामध्ये नवीन तंत्रज्ञानासह, नवीन बियाणांच्या जाती, संपूर्ण कंपन्यांची माहिती देण्यात येमार असल्याचे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.   


Modern Technology : शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानासोबत पारंपरिकतेचीही जोड द्यावी 


शेतकऱ्यांना भविष्यात जर समृद्ध व्हायचे असेल, तर त्यांनी जे विकेल तेच पिकविले पाहिजे. शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानासोबत पारंपरिकतेचीही जोड दिली पाहिजे असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. कृषी प्रदर्शन केवळ चार दिवसांचा उत्सव बनून राहिला तर त्यांना कोणताही अर्थ उरणार नाही. अशा प्रदर्शनी कृषी क्षेत्रातील ज्ञानाचे आदान-प्रदान करणारे मुक्त विद्यापीठ बनावे असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.  यावेळी धनोजे कुणबी समाज मंदिर चंद्रपूरचे अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर अडबाले, भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे उपस्थित होते. 


महत्त्वाच्या बातम्या:


Sudhir Mungantiwar : आदित्य ठाकरेंच्या गाडीवरील हल्ल्यावर काय म्हणाले मंत्री सुधीर मुनगंटीवार?