चंद्रपूर: जिल्ह्यातील पुरातन स्थळांचा कायापालट करण्यासाठी राज्याचे  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार  (Sudhir Mungantiwar) यांनी मोठी घोषणा केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 14 पुरातन स्थळांचा तब्बल  58 कोटी रुपयांच्या निधीतून कायापालट होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे वनमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही मोठी घोषणा केली आहे.या महत्वपूर्ण निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे 14 पुरातत्व स्थळांचा कायापालट होणार आहे. 


तब्बल 58 कोटी रुपयांचा भरघोस निधी


चंद्रपूर जिल्ह्याला (Chandrapur District) फार मोठा असा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.गोंड राजा खांडक्या बल्लारशाह यांनी तेराव्या शतकात चंद्रपूर शहराची स्थापना केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. शिवाय चंद्रपूरला लागून असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे वर्षाकाठी येथे लाखों पर्यटकांची रेलचेल बघायला मिळते. तसेच जिल्ह्यात अनेक पुरातन मंदिर,प्राचीन गडकिल्ले व वास्तु आहेत.या  ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा सर्वांना ज्ञात व्हावा तसेच पर्यटन वाढीसह स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळावा या उद्देशाने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे.या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील जवळ जवळ 14 पुरातन स्थळांचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. 


लोक सहभागातून बदलणार पुरातन स्थळांचा चेहरा-मोहरा


चंद्रपूर जिल्ह्यातील पुरातन स्थळांचा विकास करताना त्यामध्ये  कामाची गुणवत्ता,कामाचा दर्जा आणि कामाची गती यावर स्थानिक नागरीकांनी लक्ष ठेवावे अशी सूचना देखील पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केली आहे.पुरातत्व विभागाने प्रत्येक ठिकाणी पाच ते सहा नागरीकांची टीम तयार करावी.तसेच लोकसहभागातून या स्थळांचा विकास होईल,याबाबत नियोजन करावे.अश्या सूचना देखील मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.या पुरातन स्थळांचा प्रत्येक ठिकाणी कामांची माहिती देणारा एक फलक,सोबतच संबंधित ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारा दुसरा फलक लावावा. यात ‘क्यूआर कोड’चा समावेश असावा अशीही सूचना देखील पालकमंत्र्यांच्या वतीने या आढावा बैठकीत देण्यात आली आहे.


या 14 पुरातत्व स्थळांचा होणार कायापालट 


जिल्ह्यातील ज्या स्थळांचा कायापालट होणार आहे त्यामध्ये सोमेश्वर मंदिर (राजुरा), महादेव मंदिर (बाबुपेठ, ता. चंद्रपूर), विष्णु मंदिर (माणिकगड, ता. जिवती), सिद्धेश्वर मंदिर (देव्हाडा, ता. राजुरा), माणिकगड किल्ला टप्पा 1(ता. जिवती), माणिकगड किल्ला टप्पा 2, भवानी मंदिर (भटाळा, ता. वरोरा), ऋषी तलाव (लेणी) (भटाळा, ता. वरोरा), महादेव मंदिर (भटाळा, ता. वरोरा), शंकर मंदिर (भिसी, ता. चिमूर), गरुडस्तंभ (चंद्रपूर), खंडक्या बल्लारशाह समाधी (ता. बल्लारपूर), आणि पापामिया टेकडी (ता. चंद्रपूर) यांचा समावेश आहे.