Sudhir Mungantiwar: चंद्रपूर (Chandrapur) शहर परिसरात असणाऱ्या उद्योगांमुळं वायू, जल प्रदूषणासह आरोग्यावर परिणाम होत आहे. जिल्ह्यातील विविध उद्योगांमधील प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याबरोबर दर्जेदार कार्यपद्धती अमलात आणाव्यात, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Minister Sudhir Mungantiwar) यांनी दिले. चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्रकारचे उद्योग आहेत. त्याचप्रमाणे शहराच्या परिसरातही उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये स्टील, कागद, सिमेंट, औष्णिक वीज उद्योगांचा समावेश आहे. या उद्योगांमधून प्रदुषण होत असल्यानं त्यावर उपाययोजन करण्यासंदर्भात मंत्री मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
मंत्री मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना केलेल्या सूचना
चंद्रपूर शहरातील रामाळा तलावाला प्रदूषणमूक्त करुन सौंदर्यीकरण करण्याच्या सूचना मंत्री मुनगंटीवार यांनी केल्या. रामाळा तलावाचे सौंदर्यीकरण पूर्ण करावे. तसेच प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. त्यासाठी मोहीम स्वरूपात कार्यक्रम राबवावा. प्रदूषण दाखविणारा डिजिटल फलक शहरात प्रमुख चौकांमध्ये लावावा. प्रदूषण पातळीवरून नागरिकांनी कशापद्धतीने काळजी घेतली पाहिजे. याबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करावे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रदूषणाचा आरोग्यावरील परिणामांबाबत जनजागृती करावी, अशा सूचना मंत्री मुनगंटीवार यांनी या बैठकीत केल्या.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील रिक्त पदे भरावीत
प्रदूषणाबाबत सध्या अस्तित्वात असलेले नियम, कायदे, राष्ट्रीय हरीत लवादाचे निर्णय आदींबाबत छोट्या- छोट्या पुस्तिका तयार कराव्यात असेही मंत्री मुनगंटीवार यावेळी म्हणाले. नागरिकांना याबाबत जागरूक करावे. चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील रिक्त पदे भरावीत. तसेच जिल्ह्यात खनिकर्म निधीमधून स्मशानभूमी देण्यात येणार आहे. यामध्ये दहन विधीसाठी पारंपरिक पद्धतीऐवजी नवीन तंत्रज्ञान वापरून पर्यावरणपूरक पद्धत वापरण्यात यावी. यासाठी यामधील नवीन तंत्रज्ञान तपासण्यात यावे असे मुनगंटीवार म्हणाले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक मोटघरे यांनी सादरीकरण केले. सादरीकरणातून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाबाबत माहिती दिली. तसेच उपाययोजना सांगितल्या. या बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, सहसंचालक विद्यानंद मोटघरे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, चंद्रपूर मनपा आयुक्त पालीवाल, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या: