Chandrapur Tiger Death : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातून जाणाऱ्या बल्लारशाह-काझीपेठ रेल्वेमार्गावर पुन्हा एकदा रेल्वेच्या धडकेत वाघाचा (Tiger) मृत्यू झाला आहे. चनाखा-विहिरगाव सेक्शनमध्ये रेल्वे ट्रॅकवर आज (21 ऑक्टोबर) सकाळी वाघाचा मृतदेह आढळून आला. याच ठिकाणी 10 ऑगस्टला रेल्वेच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला होता. आज सकाळी रेल्वे ट्रॅकची नियमित तपासणी करणाऱ्या रेल्वे गॅंगमनला हा मृतदेह आढळला आणि त्यानंतर राजुरा वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. मृत वाघ ही मादी असून अंदाजे 4 वर्षांची असल्याची माहिती असून प्राथमिक तपास-पंचनामा करुन शव जाळले जाणार आहे. रेल्वेमार्गाच्या या सेक्शनवर दोन्ही बाजूंना असलेल्या जंगलाने वन्यजीवांचा वावर वाढला आहे आणि त्यामुळे अस्वल, बिबटे, चितळ आदींचा रेल्वेच्या धडकेने अनेकदा मृत्यू झाला आहे. मात्र आता 2 महिन्यात तीन वाघांचा मृत्यू ओढवल्याने ट्रॅकच्या समांतर जाळी लावण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.


अज्ञात वाहनाच्या धडकेत वाघाचा मृत्यू
याआधी काही दिवसांपूर्वीच चंद्रपूर जिल्ह्यातील सातारा-कोमटी परिसरातील जंगलात एका वाघाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. वनविभागाच्या गस्ती दरम्यान हा मृतदेह आढळून आला. मृत वाघ हा नर असून त्याचे वय 3 वर्ष असावे असा अंदाज आहे. या वाघाचे सर्व अवयव शाबूत असून त्याचा मृत्यू अंदाजे 3 ते 4 दिवस आधी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांचा उपस्थितीत त्याचे पोस्टमोर्टम केले. या वाघाचा मृत्यू एखाद्या वाहनांच्या धडकेत झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. वनविभागाने अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


10 ऑगस्टला रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू
तर चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या रेल्वेमार्गावर 10 ऑगस्ट रोजी रेल्वेच्या धडकेने वाघाचा मृत्यू झाला होता. बल्लारशाह-काझीपेठ ग्रँड ट्रंक रेल्वेमार्गाच्या चनाखा-विहिरगाव सेक्शनमध्ये रेल्वे ट्रॅकवर वाघाचे शव आढळले होते. या मार्गाची नियमित तपासणी करणाऱ्या रेल्वे गॅंगमनने घटनेची माहिती वरिष्ठ अधिकारी आणि वनविभागाला दिली. यानंतर राजुरा वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपास आणि पंचनामा करुन हे शव जाळण्या आले.  


2010 च्या तुलनेत 2022 मध्ये वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. असं असलं चोरट्या शिकारीमुळे वाघांच्या अस्तित्त्वावरील भीती कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पात वाघाचे जतन आणि संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जातात. मात्र रेल्वे किंवा अज्ञात वाहनांच्या धडकेत अशाप्रकारे वाघांचा मृत्यू होत असल्याने वन्यजीवप्रेमींकडून ट्रॅकच्या समांतर जाळी लावण्याची मागणी केली जात आहे.