चंद्रपूर :  पशु-पक्ष्यांचे आवाज काढण्याची कला अनेकांमध्ये दिसते. आपल्यातील अनेक जण आवड किंवा करमणूक म्हणून पशु-पक्ष्यांचे आवाज काढतात. मात्र मराठवाड्यातील एका तरुणानं पशु-पक्ष्यांचे आवाज काढण्याच्या याच कलेतून रोजगाराची आणि लोकांचं प्रबोधन करण्याची अतिशय चांगली संधी मिळवली आहे 


 मराठवाड्यातील हिंगोली (Marathwada Hingoli)  जिल्ह्यातील कलगाव या अगदी छोट्याश्या खेड्यातील तरुण सुमेध वाघमारे  सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र (Chandrapur Tadoba Andhari Tiger Reserve Maharashtra)  प्रकल्पात Naturalist या पदावर काम करत आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या अतिशय विशिष्ट पाहुण्यांना टायगर सफारी घडविणे हे naturalist चं काम असतं. मात्र अतिशय जुजबी शिक्षण झालेल्या सुमेध वाघमारे यांना हा अतिशय महत्वाचा त्यांच्या अंगी असलेल्या एका कलेमुळे  जॉब मिळाला आहे. 


ताडोबा व्याघ्र प्रकल्प देश-विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचं प्रमुख ठिकाण आहे. मात्र ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या बहुतांश पर्यटकांना वाघ पाहणे म्हणजेच ताडोबा पाहणे असं वाटतं. त्यामुळे ते जंगलातील इतर पशु-पक्षी-झाडं, त्यांचे आवाज, त्यांच्या हालचाली याकडे दुर्लक्ष करतात आणि वाघ दिसला नाही की निराश होतात. पर्यटकांच्या याच सवयीचा विचार करून ताडोबा प्रशासनाने सुमेध वाघमारे यांना आणखी एक महत्वाची जबाबदारी दिली आणि ती म्हणजे ताडोबातील पशु-पक्ष्यांचे आवाज कसे ओळखायचे याबदल पर्यटकांचं प्रबोधन करण्याची. यासाठी ते दररोज मोहर्ली येथे पर्यटकांसाठी खास शो ठेवतात.


सुमेध वाघमारे सुमारे 200 हून अधिक पशुपक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढतात. यातील अनेक पशु-पक्ष्यांचे आवाज त्यांनी ताडोबात आल्यावर आत्मसात केले आहेत. त्यांच्या या कलेचं पर्यटकांना देखील मोठं कौतुक वाटतं. सुमेध मुळे त्यांची करमणूक तर होतेच पण जंगलातील अनेक आवाज कसे ओळखायचे याची नवीन दृष्टी त्यांना मिळत आहे. लहानपणी खोड्या म्हणून काढलेले पशु-पक्ष्यांचे आवाज आज सुमेध चा व्यवसाय झालाय. मात्र त्याच्या या कलेमुळे वाघ म्हणजेच जंगल नव्हे तर जंगलात असलेले पशुपक्षी व इतर प्राणी देखील त्याचा अविभाज्य घटक आहे हे समजून घेण्यास ताडोबात येणाऱ्या पर्यटकांना नक्कीच मदत होईल यात शंकाच नाही.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


वनपथकाने जिरवली धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांची मस्ती; बफर क्षेत्राबाहेर काढत दंडही केला वसूल; ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील घटना