Chandrapur News : चंद्रपूर (Chandrapur) शहरातील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञाचा स्वतःच्या रुग्णालयातच मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. नेत्ररोगतज्ज्ञ (Ophthalmologist) डॉक्टर उमेश अग्रवाल यांचा त्यांच्या साई आय हॉस्पिटलमध्ये मृतदेह आढळला. मंगळवारी (11 जुलै) संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत रुग्णावर शस्त्रक्रिया केल्यानंतर थकलो असल्याचे सांगत हॉस्पिटल स्टाफला झोपतो असे सांगून उठवू नका असा निरोप त्यांनी दिला होता. मात्र सुमारे तासाभरानंतर कुठलीही हालचाल न जाणवल्याने स्टाफने केबिनमध्ये प्रवेश केला. त्यात डॉक्टर उमेश अग्रवाल मृतावस्थेत आढळले. डॉक्टर अग्रवाल यांच्या पत्नी देखील ख्यातनाम डेंटिस्ट आहेत. तर मुलगा डॉक्टरकीच्या अंतिम वर्षाला आहे. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत संभ्रम आहे. दरम्यान ही आत्महत्या (Suicide) असल्याचीही चर्चा आहे.
स्टाफने डॉक्टरांना उठवण्याचा प्रयत्न केला पण...
चंद्रपूर शहरातील आझाद बगीचा जवळच्या मुख्य रस्त्यावर डॉ. उमेश अग्रवाल यांचं रुग्णालय आहे. त्याच रुग्णालयाच्या वर त्याचं घर आहे. काल संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांनी आपल्या स्टाफला थकलो असं सांगितलं आणि वर असलेल्या त्यांच्या घरी जाऊन झोपले. साधारण एक तासानंतर एक रुग्ण आला. कन्स्ल्टेशन गरजेचं असल्याने स्टाफने डॉक्टर उमेश अग्रवाल झोपलेल्या खोलीत जाऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते उठले नाहीत, त्यांचा श्वासोच्छवास देखील थांबला होता. त्यांचा मृत पावल्याचं प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झाल्यानंतर बाकीच्या हालचाली करण्यात आल्या. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
डिप्रेशनमुळे डॉ. अग्रवाल यांनी आयुष्य संपवलं?
डॉ. उमेश अग्रवाल हे गेल्या एक ते दीड वर्षांपासून डिप्रेशनमध्ये होते अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी आयुष्य संपवलं असावं अशी शंका आहे. परंतु शवविच्छेदन होत नाही आणि पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळत नाही, तोपर्यंत त्यांनी आत्महत्या केली का हे स्पष्टपणे सांगता येणार नाही. डॉ. उमेश हे चंद्रपुरातील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ आहेत. त्यामुळे त्यांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
चंद्रपुरात मार्च महिन्यात डॉक्टर दाम्पत्याचा अपघाती मृत्यू
मार्च महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील नवीन वरोरा-वणी मार्गावर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. नव्या महामार्गावर कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायवाने धडक दिली. मारेगाव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी गौरकार आणि त्यांचे पती डॉ. अतुल गौरकार यांचा अपघातात घटनास्थळीच मृत्यू झाला. महामार्गावरच्या शेंबळ गावाजवळ अपघात झाल्यावर स्थानिकांनी दोघांना वरोरा ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र तोवर उशीर झाला होता. हे दाम्पत्य लहान मुलाला मारेगाव येथे ठेऊन कामानिमित्त नागपुरात गेले होते. परत येताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. वरोरा पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत.