Chandrapur Crime : पुतण्याने दगडाने ठेचून काकूचा खून (Murder) केल्याची घटना चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पोंभुर्णा तालुक्यातील सोनापूर येथील ही घटना असून पुष्पा मधुकर ठेंगणे असं 62 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. ही घटना काल (10 जुलै) दुपारी तीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोंभुर्णा पोलिसांनी आरोपी धीरज ठेंगणे (वय 20 वर्षे) याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी खून करुन पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


हत्या करण्याचं कारण काय?


सोनापूरमधील पुष्पा ठेंगणे यांची सून काल दुपारी शेतातून परत येत होती. त्यावेळी आरोपी धीरज ठेंगणे याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. गुरांच्या गोठ्याजवळ काम करत असताना ओझं उचण्याच्या बहाण्याने आरोपी धीरज ठेंगणेने पुष्पा ठेंगणे यांच्या सूनेला बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने प्रतिकार करुन तिथून पळ काढला आणि घरी येऊन सर्व आपबिती आपल्या सासूला सांगितली. यामुळे संतापलेल्या पुष्पा ठेंगणे या पुतण्या धीरजला जाब विचारण्यासाठी गेल्या. मात्र यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यात आरोपीने काकूचा दगडाने ठेचून खून केला. इतकंच नाही तर खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह घराशेजारच्या शेणाच्या खड्ड्यात टाकून आरोपी फरार झाला. 


हत्या करुन आरोपी पसार, पोलिसांकडून शोध सुरु


यानंतर घटनास्थळावर पोहोचलेल्या मृत पुष्पा ठेंगणे यांच्या मुलाला त्यांचा मृतदेह शेणाच्या खड्ड्यात दिसला. त्याने याची माहिती पोंभुर्णा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसंच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी फरार आरोपीवर भादंवि कलम 302, 354, 354 ब, 329, 201 आणि 501 अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला आहे. पुढील तपास पोंभुर्णा पोलीस स्टेशनचे अधिकारी मनोज गदादे करत आहेत.


अल्पवयीन मुलीची छेडछाड, पोलीस कर्मचाऱ्यासह पाच जण अटकेत


अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी चंद्रपूर पोलीस दलातील एक पोलीस कर्मचारी आणि इतर चार जणांना अटक केल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या घटनेमुळे चंद्रपूर पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली. जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी पोलीस कर्मचारी सचिन बावणे याला तात्काळ निलंबित केलं. सचिन बावणे हा C-60 दलातील पोलीस कर्मचारी आहे.


हेही वाचा


Chandrapur Crime : चंद्रपुरात अल्पवयीन मुलीची छेडछाड, पोलीस कर्मचाऱ्यासह पाच जण अटकेत