Chandrapur ZP School : शाळेची जीर्ण इमारत प्रशासनाने पाडून टाकली, मात्र गेल्या तीन वर्षांपासून नवीन इमारतीचा पत्ताच नाही. ही विदारक परिस्थिती आहे चंद्रपूर (Chandrapur) शहरापासून केवळ 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कढोली गावातील. अशा परिस्थितीतही जिल्हा परिषद शाळेची (ZP School) पटसंख्या कमी झालेली नाही ही विशेष बाब. मात्र भविष्यात पटसंख्या एवढीच राहिल या शाश्वती नाही. त्यामुळे आता ग्रामपंचायतीने थेट जिल्हा परिषदेतच वर्ग भरवण्याचा इशारा दिल्याने हालचालींना वेगाने होत आहेत. 


सर्व ऋतु झेलत कधी झाडाखाली तर कधी समाज मंदिरात शिक्षणाते धडे


महाराष्ट्र राज्याने आपल्या नीतिनिर्धारणात शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले. निदान असं सांगितलं तरी जातं, मात्र शिक्षणाच्या दयनीय अवस्थेचं चित्र चंद्रपूर शहरापासून केवळ 15 किलोमीटर अंतरावरच्या कढोली या गावात पाहायला मिळतं. मागील तीन वर्षांपासून शाळेची इमारत नसल्याने विद्यार्थी सर्व ऋतु झेलत कधी झाडाखाली तर कधी ग्रामपंचायतीने दिलेल्या समाजमंदिरात शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.


"1949 रोजी ही शाळेची स्थापना झाली. 1960-62 शाळेची इमारत गावकऱ्यांनी श्रमदानातून बांधली होती. 2018 पर्यंत इमारती जीर्ण झाली. कौल विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडल्याच्या घटनाही घडली होती.  आम्ही चंद्रपूर जिल्हा परिषदेत इमारत निर्लेखनचा पाठवलेला प्रस्ताव 2019 मध्ये मंजूर झाला. 2020 मध्ये इमारत पाडण्यात आली. तेव्हापासून इमारत बांधलेली नाही. यामुळे आम्हा अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागल आहे. सध्या पहिली ते चौथीचे वर्ग आहेत आणि पटसंख्या 62 आहे. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना समाजमंदिरात बसवावं लागतं. पण ते अपुरं पडतं. पावसाळ्यात मुलांना शिकवण्यात अडचणी येतात. पाऊस नसताना विद्यार्थ्यांना झाडाखाली किंवा व्हरांड्यात बसवतो," असं शाळेच्या मुख्याध्यापक अनुजा कुडगे यांनी सांगितलं. 


कढोली ग्रामपंचायतीने वारंवार पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करुनही इमारतीचं प्रत्यक्ष बांधकाम आणि निधीबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून चालढकल होत आहे. विशेष म्हणजे शाळेला इमारत नसताना देखील शाळेची असलेली 62 ही पटसंख्या कौतुकाचा विषय आहे. मात्र इमारती अभावी ही पटसंख्या कधीपर्यंत टिकणार हाही प्रश्नच आहे.


कोविडच्या परिस्थितीमुळे इमारतीच्या कामाला विलंब : शिक्षणाधिकारी


इथले वर्ग जिल्हा परिषदेत भरवले जातील असा इशारा ग्रामपंचायतीने दिल्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी कोविड परिस्थितीचे कारण सांगत यात विलंब झाल्याचे मान्य केले असून लवकरच कामाला सुरुवात होईल असा विश्वास दिला आहे. "मागच्याच वर्षी प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्याच वर्षाच्या अंदाजपत्रकाच्या नियोजनात त्या कामाचा समावेश केला होता. परंतु मध्यंतरी कोविडच्या कारणास्तव आणि शासनस्तरावर बाकीच्या कामांना बंधन असल्यामुळे थोडा विलंब झाला. परंतु आता टेंडरला ते काम गेलं आहे," असं चंद्रपूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी सांगितलं.


ज्या ठिकाणी उत्तम इमारती आहेत त्या ठिकाणी शिक्षक नाहीत. जिथे दोन्ही आहे तिथे विद्यार्थी नाही. मात्र ज्या भागात विद्यार्थ्यांची वानवा नाही त्या भागात उत्तम सुविधा देणे प्रशासनाच्या हातात आहे. तेवढे झाले तरी बरेच साध्य होणार आहे.