Chandrapur Tiger Death : चंद्रपुर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा वाघांचा (Tiger) मृत्यू झाल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 5 दिवसात चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur News) विविध कारणांमुळे तब्बल 3 वाघांचा मृत्यू (Tiger Death) झालाय. आज सकाळी सावली तालुक्यातल्या सामदा गावाजवळील एक वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गोसेखुर्द कालव्याच्या बाजूला असलेल्या शेतात हा मृत वाघ आढळल्यानंतर वनपथक घटनास्थळी दाखल झाले असून वाघाच्या मृत्यूबाबत तपास सुरू करण्यात आलाय. मात्र गेल्या पाच दिवसांतली ही सलग तिसरी घटना घडल्याने वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
गावाला 25 लाखांचे अनुदान तरी वाघांचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात काल 24 डिसेंबरलांच शिकारीच्या शोधात असतांना विहीरीत पडून एका वाघाचा मृत्यू झाला होता. नागभीड तालुक्यातील गोविंदपूर शेत शिवारातील ही घटना घडली. मृत वाघ नर असून अंदाजे दीड वर्ष त्याचं वय आहे. धक्कादायक म्हणजे या गावाला सरकार कडून वन्यजीवांच्या संरक्षणासाठी 25 लाखांचं अनुदान मिळालं आहे. मात्र सरकार कडून अनुदान मिळून देखील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी विहिरींना कठडे बांधण्यात आलेले नाही. सरकार कडून मिळालेल्या निधीच्या चौकशीची वन्यजीव प्रेमींनी मागणी केली आहे. सलग तीन वाघांच्या मृत्यूने वन्यजीवप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
5 दिवसांत 3 वाघांचा मृत्यू
गुरूवार, 21 डिसेंबरला चंद्रपूर जिल्ह्यात शिकारी करिता लावलेल्या विद्युत प्रवाहाचा करंट लागून एका वाघाचा मृत्यू झालाय. ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत येणार्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बिट मधल्या मेंढामाल शेतशिवारातील ही घटना आहे. मृत वाघ नर असून अंदाजे दोन ते अडीच वर्ष त्याचं वय आहे. सध्या या भागातील धान पीक काढणी झाल्यामुळे हा विद्युत प्रवाह पिकांच्या संरक्षणासाठी नसून कुणीतरी वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठीच हा विद्युत प्रवाह सोडल्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर 24 डिसेंबर रविवारी ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत येणाऱ्या तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील गोविदपुर बिटात गट न.165 सापेपार माल मधील मुमताज अहमद नुराणी यांच्या शेतातील विहिरीत पडून वाघाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. हा वाघ शिकारीच्या शोधात शेतात आला आणि विहिरीत पडून मृत्यू पावल्याचा अंदाज वनविभागाने लावला. या घटनेला अवघे काही तास उलटून जात नाही तर आता पुन्हा सावली तालुक्यातल्या सामदा गावाजवळील एक वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वनविभागाकडून घटनेचा तपास सुरू
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र असं असतांनाच वाघांच्या अपघाती मृत्यूंमध्ये देखील वाढ झाली आहे, ज्याकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे वाघांच्या अपघाती मृत्यूंच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा वाघांच्या संरक्षणाचा मुद्दा 'राम भरोसे' तर नाही ना, असा सवाल या निमित्याने उपस्थित केला जातोय.