Chandrapur : चंद्रपूर शहरालगत एका युवकाच्या सतर्कतेमुळे मोठा रेल्वे अपघात Train Accident टळलाय. चंद्रपूर शहरालगत असलेल्या बाबूपेठ रेल्वे स्टेशनपासून काही मीटर अंतरावर रेल्वे ट्रॅक तुटल्याचे या तरुणाच्या वेळीच लक्षात आले आणि त्याने रेल्वे ट्रॅक तुटल्याची माहिती रेल्वे प्रशासन व कर्मचाऱ्यांना दिल्या मुळे संभाव्य अपघात टाळता आला. प्रशासनाने याची तातडीने दखल घेत एक पथक पाठवून ट्रॅकला जुजबी स्वरूपात दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र यात यश न आल्याने अखेर रेल्वेरुळाचा एक भागच बदलण्यात आला. 


रेल्वे अपघात अनेकदा प्रवाशांच्या हलगर्जीमुळे होण्याचं प्रमाण जास्त आहे. रेल्वे प्रशासनाकडून होणाऱ्या त्रुटींमळे अपघात होण्याचं प्रमाण तुलनेने कमी आहे. अशातच प्रसंगावधान राखून अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचं योगदान मोलाचं ठरतं. अनेकदा बघ्यांच्या भूमिकेने अपघात होणाऱ्याचं किंवा झालेल्याचं भविष्य ठरतं. मात्र दक्ष नागरीकांमुळे अनेक मोठे अपघात टाळता येतात हे तितकंच खरंय. एका सतर्क नागरिकाच्या समयसूचकतेमुळे अनर्थ टळलाय. गाईचा अपघात होऊ नये यासाठी गाईला हुसकावून लावताना नागरिकाची नजर तुटलेल्या रेल्वे ट्रॅककडे गेली. त्यामुळे त्याने समयसूचकता दाखवत तातडीने याची माहिती बाबुपेठ रेल्वे स्टेशन वर असलेल्या कर्मचाऱ्यांना दिली.   


नेमकं घडलं काय?


आज सकाळी लालपेठ Lalpeth भागात राहणाऱ्या शरफुद्दीन पठाण नावाचा हा तरुण आपल्या मित्राला भेटण्यासाठी बाबूपेठ रेल्वे स्टेशन वर आला होता. त्याचा मित्र वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या बाबुपेठ रेल्वे स्टेशनवर असलेल्या कोल साइडिंग वर कामाला आहे. हा मित्र न भेटल्याने शरफुद्दीन घरी जाण्यास निघाला. मात्र त्याच वेळी रेल्वे ट्रॅक वर त्याला एक गाय बसलेली दिसली. गाईचा अपघात होऊ नये यासाठी त्याने गाईला हुसकावून लावले मात्र याच वेळी त्याची नजर तुटलेल्या रेल्वे ट्रॅककडे गेली. त्यामुळे त्याने समयसूचकता दाखवत तातडीने याची माहिती बाबुपेठ रेल्वे स्टेशनवर असलेल्या कर्मचाऱ्यांना दिली.   


या प्रकारामुळे बल्लारपूर-बिलासपूर हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग काही काळासाठी बाधित झाला होता. ट्रॅक बदलविल्यानंतर आधी मालगाडी या ट्रॅकवर चालवून ट्रॅक ची चाचणी करण्यात आली व त्यानंतरच या मार्गावरून सुपरफास्ट एक्सप्रेस सोडण्यात आल्या. रेल्वे पथकाच्या दुरुस्ती चमुच्यावतीने 24 तास रेल्वे रुळांची पाहणी होत असते. मात्र रेल्वे ट्रॅकच तुटल्याचा प्रकार गँगमनच्या कसा लक्षात आला नाही याबद्दल मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत या बल्लारपूर विभागाचे रेल्वे अभियंता एस.के.गुप्ता यांच्यासोबत संपर्क केला असता त्यांनी मीटिंग मध्ये असल्याचा बहाणा करत या घटनेबाबत बोलण्यास टाळाटाळ केली. मात्र या प्रकारामुळे रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.