Success Story : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील एका 22 वर्षाच्या युवा शेतकऱ्यानं आधुनिक शेती करत मिरची (chilli) पिकाचं मोठं उत्पादन घेतलं आहे. साहिल मोरे (Sahil More) असं या युवा शेतकऱ्याचं नाव आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तोहगाव या गावातील साहिलने आठ एकर शेतीमध्ये तब्बल 50 लाख रुपयांचं उत्पन्न घेतलं आहे.
चंद्रपूर जिल्हा हा अनेक वेळा कोळशामुळं ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून ओळखला जातो. मात्र, आता चंद्रपूर जिल्ह्याची ओळख रेड गोल्ड सिटी म्हणून होऊ लागली आहे. याचं उदाहरण म्हणजे साहिल मोरे सारखे युवा शेतकरी. गोंडपिपरी तालुक्यातील तोहगाव येथील साहिलने यावर्षी मिरचीचे बंपर पिक घेतलं आहे. या शेतकऱ्याने आठ एकर शेतीमध्ये जवळपास 50 लाखांचं उत्पन्न घेतलं आहे. त्याने पारंपारीक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची कास धरली आहे. त्यामुळेचं एवढ उत्पादन काढणं शख्य झाल्याची माहिती साहिलन दिली आहे.
मिर्ची उत्पन्नासाठी एकरी 1.5 लाखांपर्यंत खर्च
साहिलचा मिर्ची उत्पन्नासाठी एकरी 1.5 लाखांपर्यंत खर्च झाला आहे. या शेतीतून त्याला निव्वळ नफा किमान 35 लाख मिळणार आहे. विशेष म्हणजे साहिलची शेती वर्धा नदीच्या जवळ असल्यानं कापूस-सोयाबीन सारख्या पारंपरिक शेतीत त्यांचे पुरामुळं मोठं नुकसान होत होते. त्यामुळं त्याने नोव्हेंबरनंतर लागवड होणारं मिर्चीचे पीक निवडले. ड्रीपच्या माध्यमातून खतं देऊन पिकांवरील उत्पादन खर्च कमी करणं, कुशल व्यवस्थापन आणि तांत्रिक सल्ला घेऊन या शेतकऱ्याने ही किमया साधली आहे. साहिल मोरेने दहावीनंतर हॉर्टिकल्चर सायन्स हा विषय घेतला. त्यानंतर बीएससी ऍग्रीकल्चर घेत आपलं शिक्षण सुरु ठेवलं आहे. मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याने आधुनिक शिक्षण आणि शेतीची कास धरली तर काय होऊ शकतं हे त्याने आपल्या उदाहरणातून दाखवून दिलं आहे.
पिकाला जेवढी खतांची गरज तेवढीच देतो
मी आधुनिक पद्धतीने शेती करतो. पिकाला जेवढी खतांची गरज आहे तेवढीच आम्ही देतो. तसेच पिकाला ड्रीप असल्यामुळं पाण्यात बचत होते. उत्पन्नात वाढ होते. फळांची चांगली वाढ होते. त्यामुळं बाजारात पिकाला चांगला दर मिळत असल्याचे साहीलने सांगितले. पारंपारिक पद्धतीन मिरचीतून कमी उत्पन्न मिळत होते. खतांचा मोठा खर्च होत होता. मजूर खूप लागत होते. त्यामुळं आम्ही ड्रीप करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती साहिलने दिली.
महत्त्वाच्या बातम्या: