चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur) भरधाव ट्रक एका ऑटोरिक्षावर (Auto Rickshaw) उलटल्याने भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात रिक्षाचालकासह चार जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  हा दुर्दैवी अपघात रात्री साडेसातच्या सुमारास घडला.


चार जणांचा मृत्यू, चार जण जखमी


चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास मार्गावर बुधवारी (27 सप्टेंबर) रात्री हा अपघात झाला. भरधाव ट्रक एका ऑटोरिक्षावर उलटल्याने चार जणांचा मृत्यू झाला. तर अपघातात चार जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. संगीता चाहांदे (वय 56 वर्षे, रा. गडचिरोली), अनुष्का खेरकर (वय 22 वर्षे, रा. बल्लारपूर), प्रभाकर लोहे आणि ऑटो चालक इरफान खान (वय 49 वर्षे, रा. बाबूपेठ) अशी मृतांची नावे आहेत. 


कसा झाला अपघात?


अष्टभुजा मंदिराजवळील रेल्वे उड्डाणपुलावरुन एक ट्रक (एम एच 34 एम 1817) भरधाव वेगात येत होता. परंतु वेगामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटलं आणि तो शेजारुन जाणाऱ्या एका ऑटोरिक्षावर (एम एच 34 एम 8064) उलटला. ट्रकखाली चिरडलं गेल्याने ऑटोतील चार प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, ज्यात रिक्षाचालकाचाही समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना उपाचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. राजकला मोहूर्ले (वय 34 वर्षे, रा. बाबूपेठ), गीता शेंडे (वय 50. रा. तुकुम, दशरथ बोबडे (वय 50 वर्षे, रा. वणी) अशी तीन जखमींची नावं असून एकाची ओळख अद्याप पटलेली नाही. 


वाहतूक तासभर होती ठप्प


दरम्यान अपघातामुळे घटनास्थळी सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पीएसआय हिवसे यांनी अपघातस्थळाचा पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहनं हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.


हेही वाचा


Jejuri Accident : नवा संसार थाटला, खंडोबाच्या दर्शनाला निघाले, मात्र काळाने घात केला; विहिरीत रिक्षा कोसळून दाम्पत्याचा मृत्यू