चंद्रपूर : शेतमालाला जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत सरकारला स्वस्त बसू देणार, वेळ आली तर नेपाळ सारखे घरात घुसू असा इशारा माजी आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला आहे. शेती आणि शेतकऱ्यांबाबत असलेल्या राज्य सरकारच्या धोरणांवरही बच्चू कडू यांनी टीका केली. चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी येथे आयोजित जनसभेत बोलताना त्यांनी सरकारला इशारा दिला.
चंद्रपूर जिल्ह्यात बच्चू कडू यांनी आंदोलन आणि जनसभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसमोर 28 तारखेच्या त्यांच्या आंदोलनासाठी भूमिका मांडली. सावली तालुक्यातील पाथरी या अतिशय दुर्गम भागातील गावात त्यांनी जनसभा घेत सरकार विरोधात जोरदार टीका केली. सरकार आम्हाला सातत्याने लुटत असून वेळ पडली तर आम्ही नेपाळसारखे घरात घुसू, आम्हाला पेटवणं जमणार नाही, पण घरात बांधून ठेवू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, त्यांच्या शेतमालाला भाव मिळावा यासाठी माजी आमदार बच्चू कडू आंदोलन करत आहेत. दरम्यान, यापुढे आपण कोणत्याही आरक्षणाच्या व्यासपीठावर जाणार नाही, फक्त शेतकऱ्यांसाठीच लढणार असं ते म्हणाले. तसेच शेतकऱ्यांसाठी एवढं लढूनही आपल्याला साथ मिळत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती.
15 ऑक्टोबरच्या आत सोयाबीन खरेदी सुरु
सोलापूरमधील सभेत बोलताना बच्चू कडू म्हणाले होते की, "आता आम्हाला सांगता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पैसे नाहीत. देशातील 200 उद्योगपत्यांचे तुम्ही 18 ते 24 लाख कोटी कर्ज माफ केलं आहे. शेतकऱ्यांचे 30 ते 40 हजार कोटी कर्ज माफ करायला काय होते? आमचं सोयाबीन, तूर, धान याला 20 टक्के बोनस द्यायला पाहिजे, त्यासोबतच GST चा परतावा देणार असंही सांगितलं होते, मात्र काहीच होते नाही. अतिवृष्टी झाली त्यावर कोणी बोलायला तयार नाही. सोयाबीन 3 हजार 400 रुपयांनी विकायला निघणार आहे त्यावर सरकार बोलायला तयार नाही. 15 ऑक्टोबरच्या आत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु झाली नाहीतर आम्ही सोयाबीन कलेक्टर आणि पालकमंत्र्यांच्या घरात नेऊन टाकणार."
मी फक्त शेतकऱ्यांसाठी बोलणार
प्रत्येक जातींना आपापल्या आरक्षणासाठी लढावं, मात्र कार्यकर्त्यांनी आणि समाज बांधवांनी आपसात भांडू नये, गावातले वाद वाढवू नये असं आवाहन बच्चू कडू यांनी केलं. मी कुठल्याच जातीबद्दल बोलणार नाही हे शपथ घेऊन सांगितलं आहे. मी फक्त शेतकऱ्यांसाठी बोलणार आणि शेतकरी हा सगळ्यात जातीत, धर्मात आहे. त्यांच्यासाठी मी माझं आयुष्य वाहून घेणार असल्याचे कडू म्हणाले.
गोरक्षणाच्या नावाखाली गुंड-कार्यकर्त्यांचे पोट भरत आहेत
अख्खा गोदावरीचा पट्टा पाण्याखाली आहे, शेतकरी संकटात आहे, यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी एकतरी दौरा केलेला दाखवा असं बच्चू कडू म्हणाले. हेच लोक उद्धव साहेबांना नाव ठेवायचे, आता हेच साहेब ऑनलाईन झाले आहेत अशी टीका कडू यांनी केली.
गोवंश हत्या बंदीच्या बाबतीत गुंड कार्यकर्त्यांचा पोट भरण्याचा कार्यक्रम लावलेला आहे. माझं म्हणणं आहे की गोमातेला कापू नये, त्याबद्दल एकमत आहे. गाय गोरक्षणामध्ये ठेवली तर पैसे भेटतात आणि गाईला शेतकऱ्यांपाशी ठेवलं तर काहीच भेटत नाही. हा कसला न्याय आहे असे कडू म्हणाले. गोरक्षकाला अनुदान देता, तर मग शेतकऱ्याला का अनुदान देत नाही? असा प्रश्न बच्चू कडू यांनी विचारला.