औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केले होते. रस्त्यांच्या कामात मराठवाड्यातील लोकप्रतिनिधीचं मोठा अडथळा आहेत. कंत्राटदारांना कामाची टक्केवारी मागतात. अशा लोकप्रतिनिधीमुळं रस्त्यांच्या कामाचा दर्जा घसरलाय. रस्ते वेळेत पूर्ण होत नाहीत, अशी नाराजी गडकरी यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. या प्रकरणात माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी उडी घेतली आहे. खैरे यांनी म्हटलं आहे की, गडकरींचं ते वाक्य भाजपच्या 'त्या' नेत्यांसाठी होते. ज्याने मराठवाड्यातील सर्व कंत्राट आपल्या नातेवाईकांच्या घेतली आहेत. त्या व्यक्तीने प्रसिद्ध राजूर गणपती संस्थानाची जमीन देखील हडप केली आहे. स्वतः गडकरी यांनी ते नाव आपल्याला सांगितले होते. जे सर्वांना माहीत असून स्वतः गडकरींनी ते नाव जाहीर करावे असे आवाहन देखील चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. खैरे यांचा रोख केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे असल्याची चर्चा आहे.


खैरे म्हणाले की, माझ्याकडे एक कॅन्ट्रॅक्टर आला होता. कामामध्ये एक मोठा नेता त्रास देत आहे अशी तक्रार त्याने केली. मी त्याला गडकरींकडे घेऊन गेलो. गडकरींनी मला त्या व्यक्तीचं नाव सांगितलं. मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी देखील या विषयावर बोललो तर मुख्यमंत्री म्हणाले आता काय करणार? त्यांच्याच पक्षाचा ज्येष्ठ नेता अशी कामं करत होता. त्या नेत्याच्या जिल्ह्यातील कामं बघा. त्या कामांविरोधात अर्जून खोतकर यांनी देखील त्या नेत्याविरोधात आवाज उठवला.  त्या प्रसिद्ध व्यक्तिकडेच सगळी कामं गेली आणि त्या रस्त्याच्या कामांची दुर्दशा झाली आहे. तो नेता प्रचंड भ्रष्टाचारी आहे. अशा नेत्यांवर सीबीआयने छापे टाकावेत, असे ते म्हणाले.


नितीन गडकरींनी मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केला होता. गंभीर बाब अशी की औरंगाबादच्या बैठकीत गडकरींना कंत्राटदारांनी थेट काही लोकप्रतिनिधींची नावचं सांगितली. नितीन गडकरी यांच्या समोर उस्मानाबाद जिल्ह्यातील 100 कोटींच्या एका रस्त्याचा विषय आला होता. कंत्राटदारांनं लोकप्रतिनिधी दोन टक्क्याप्रमाणं दोन कोटी मागत असल्याचा बैठकीत आरोप केला होता. इतकेच नव्हे पैसे दिल्याशिवाय कामच सुरू करू देत नाही, असं गडकरींना सांगितलं होतं.



भाजप आमदार-खासदारांमध्ये जुंपली
गंगापूरचे आमदार प्रशांत बंब हे ब्लॅकमेलर आहेत, असा आरोप नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी केला. तर चिखलीकर भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केला होता. नांदेड जिल्ह्यातील पेनुर-शेवडी-सोनखेड या रस्त्याच्या कामावरुन भाजपच्या बंब आणि चिखलीकर यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत.