Samruddhi Highway : बुलढाणा : समृद्धी महामार्ग हा अजूनही लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. नागपूर ते शिर्डीपर्यंत हा महामार्ग काही ठिकाणी पुलाचं काम सोडलं तर जवळपास पूर्णत्वास आलेला आहे. परंतु वाहतुकीसाठी याची कोणतीही तांत्रिक चाचणी झालेली नाही. मात्र तरीही या महामार्गावरुन खाजगी प्रवासी वाहने, ट्रक सुसाट वेगाने धावताना दिसत आहेत. तीन-चार दिवसांपूर्वीच बुलढाण्यातील मेहकर इथल्या व्यापाऱ्यांच्या कारला गंभीर अपघात होऊन एक व्यापाऱ्याला आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे समृद्धी महामार्ग प्रशासनाने या मार्गावरुन वाहतूक करु नये, असं आवाहन देखील केलं होतं. पण तरीही आज सकाळी या महामार्गावर खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने, ट्रक सुसाट जाताना दिसत आहेत.
चालकाचं नियंत्रण सुटून 12 जून रोजी अपघात
समृद्धी महामार्ग सुरु होण्यापूर्वीच त्यावरुन वाहतूक सुरु असल्याने अपघातांना सुरुवात झाली आहे. काही व्यावसायिक औरंगाबादमधून समृद्धी महामार्गावरुन मेहकरकडे येत होते. अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. त्याचवेळी तांदुळवाडी शिवारात पोहोचले असताना चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं. परिणामी कार महामार्गावरील डिव्हायडरच्या खड्ड्यात पलटून अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारने तीन ते चार वेळा पलटी घेऊन खड्डयात अडकली. या अपघातात मेहकर इथले व्यावसायिक बळीराम खोकले यांनी जागीच प्राण सोडले तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातात कारचा चुराडा झाला.
समृद्धी महामार्गावर अनेक ठिकाणी काम सुरु
समृद्धी महामार्गाचं लोकार्पण दोन वेळा पुढे ढकलण्यात आलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे अजूनही समृद्धी महामार्गचं काम हे अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. वाशीम जिल्ह्यात दोन ठिकाणी मोठ्या पुलाचं काम सुरु असून बुलढाण्यात खडकपूर्णा नदीवरील पुलाचं काम करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी छोटे-मोठे गॅप जोडण्यात येत असल्याने या महामार्गावरुन वाहतूक करणं धोकादायक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि देऊळगाव राजा येथील महामार्गावरील एन्ट्री पॉईंट्सवर कुणाचेही निर्बंध नसल्याने नागरिक आपली वाहने समृद्धी महामार्गावर घेऊन जातात. या मार्गावरुन नागपूरच्या दिशेने किंवा औरंगाबाद, शिर्डीकडे प्रवास करतात. महामार्गावर सध्या वाहने कमी असल्याने वाहनचालक सुसाट वेगाने जात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे महामार्गावर अपघात होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसात या परिसरात महामार्गावर छोटे मोठे चार अपघात घडले असून आता यावर निर्बंध घालणं गरजेचं झालं आहे.
महामार्गावरुन वाहतूक करणं धोकादायक
हा महामार्ग लवकरच पूर्णत्वाकडे जाणार असला तरी देखील तांत्रिक तपासणीनंतरच या मार्गावरुन वाहतुकीची परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे या महामार्गावरुन सुसाट वाहने घेऊन जाणं धोकादायक असून नागरिकांनी प्रवास करु नये असं आवाहन करण्यात येत आहे. शिवाय संबंधित विभागाचे अधिकारी यावर बंधन घालतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.