Buldhana Rain : बुलढाणा जिल्ह्यात मंगळवारी (14 जून) संध्याकाळी सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे भोगावती नदीवरील वळण पूल वाहून गेला. यामुळे सिंदखेडराजा-लव्हाळा मार्ग ठप्प झाला. भोगावती नदीवरील नवीन पुलाचं बांधकाम अनेक महिन्यापासून बंद असल्याने याठिकाणी वळण मार्गवर तात्पुरता पूल बनवण्यात आला होता. भोगावती नदीला आलेल्या पाण्यामुळे हा वळण पूल वाहून गेल्याने हा मार्ग ठप्प झाला. तर चिखली, सिंदखेडराजा, मेहकर तालुक्यात आलेल्या पावसाने मात्र शेतकरी सुखावला आहे.

Continues below advertisement

स्थानिकांच्या सतर्कतेमुळे वाहून जाणारे दोन शेतमजूर बचावलेदुपारी चार वाजल्यानंतर आलेल्या पावसाने तीन तास या परिसराला झोडपलं. यामुळे भोगावती नदी तुडुंब भरुन वाहू लागली. त्याच वेळी शेतात काम करणारे शेतकरी, शेतमजूर घराकडे परतत होते. भोगावती नदीच्या पाण्याचा प्रवाह पार करताना दोन शेतमजूर वाहून जाताना जवळच असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे बचावले. जवळपास 100 मीटर हे दोघे वाहत गेले होते. यावेळी सिंदखेडराजा महसूलचे अधिकारीही घटनास्थळी होते

कोराडी नदीला आलेल्या पुरामुळे पूल वाहून गेला, दोन तालुक्यांचा संपर्क तुटलादरम्यान याच परिसरात असलेल्या कोराडी नदीला आलेल्या पुरामुळे सिंदखेडराजा तालुक्यातील सवडत ते मेहकर तालुक्यातील गजरखेड मार्गावरील कोराडी नदीवरील मातीचा पूल वाहून गेल्याने सिंदखेडराजा आणि मेहकर तालुक्याचा संपर्क तुटला आहे. या मार्गावरील जवळपास 40 खेड्यांचा तालुका मुख्यालयाशी दैनंदिन कामकाजासाठी संपर्क येतो, आता मार्ग बंद असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागणार आहे.

Continues below advertisement

पहिल्याच पावसात निर्माणाधीन पूल वाहून गेला यापूर्वी 12 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे लोणार तालुक्यातील निर्माणाधीन पुलाचं काम वाहून गेल्याने चार गावाचा संपर्क तुटला होता. शिवाय या मार्गावरील वळण रस्ताही वाहून गेल्याने कोनाटी, झोटिंगा, देऊळगाव कोळ, महार चिकना या गावाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. बुलढाणा जिल्ह्यात 12 जून रोजी दुपारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने पहिल्याच पावसात काही ठिकाणी दाणादाण उडाली. मार्गावरील पुलाचं काम चालू असल्यामुळे वळण रस्ता वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होतं. तर मलकापूर तालुक्यात फक्त 30 मिनिटे झालेल्या मुसळधार पावसामुळे  नदी नाल्याना पूर आल्याने देवधाबा गावातील काही घरात पाणी शिरलं होतं. त्यामुळे पहिल्याच पावसात नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागला होता.