112th death anniversary of Shri Sant Gajanan Maharaj : श्री संत गजानन महाराज (Shri Sant Gajanan Maharaj) यांच्या 112व्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात (Shegaon) दाखल झाल्या आहेत. 1910 साली ऋषीपंचमीच्या दिवशी गजानन महाराजांनी (Gajanan Maharaj) समाधी घेतली होती. तेव्हापासून दरवर्षी ऋषीपंचमीला (Rishi Panchami 2022) शेगावात (Shegaon News) पुण्यतिथी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. काल रात्रीपासूनच भाविक शेगावात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळी 11 वाजता मुख्य आरती झाल्यानंतर गजानन महाराज (Sant Gajanan Maharaj) पालखीच्या नगर परिक्रमेला सुरुवात होईल. 


तब्बल दोन वर्षांनी राज्यभरात निर्बंधमुक्त सण-उत्सव साजरे केले जात आहेत. कालपासून गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2022) सुरुवात झाली आहे. घराघरांत गणरायाचं आगमन झालं आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर यावर्षी श्री संत गजानन महाराज यांचा 112वा पुण्यतिथी सोहळा (Shri Sant Gajanan Maharaj 112th Death Anniversary) आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषीपंचमी. याच दिवशी संत गजानन महाराज यांनी समाधी घेतली होती. हा दिवस महाराजांचा पुण्यतिथी उत्सव म्हणून साजरा केला जातो. गेली दोन वर्ष कोरोनामुळे या सोहळ्यावरही निर्बंध होते. यंदा मात्र शेगावात निर्बंधमुक्त सोहळा साजरा केला जाणार आहे. 


शेगावातील उत्सवासाठी राज्यभरातून जवळपास 500 भजनी दिंड्या शेगावात दाखल झालेल्या आहेत. आज सकाळपासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी मंदिर परिसरात बघायला मिळत आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या या दिंड्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रींच्या पालखी आणि नगरपरिक्रमेत सामील होऊन महाप्रसाद घेऊन आपापल्या गावी रवाना होतात. संत गजानन महाराज संस्थानच्या वर्षभरातील उत्सवांमध्ये हा एक मोठा उत्सव असतो. आज सकाळी 11 वाजता मुख्य आरती होईल आणि त्यानंतर गजानन महाराजांच्या पालखीच्या नगर परिक्रमा सोहळ्याला सुरुवात होईल. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर यावर्षी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. जवळपास एक लाख भाविक गजानन महाराजांचा पुण्यतिथी सोहळ्यासाठी शहरात दाखल झाले आहेत. आज दिवसभर मंदिरात मोठ्या भक्तीमय वातावरणात वेगवेगळ्या कार्यक्रमांनी हा सोहळा संपन्न होणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


धार्मिक स्थळांनी शेगावच्या मंदिराचा घ्यावा आदर्श; परवानगी असूनही कमी आवाज होते आरती