MLA Sanjay Gaikwad : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास अकरा लाखांचे बक्षीस देऊ, असे वादग्रस्त वक्तव्य केलेल्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळली. आज बुलढाणामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला. या मोर्चामध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार अरविंद सावंत सहभागी झाले. या दोन्ही नेत्यांच्या सहभागावर बोलताना आमदार संजय गायकवाड यांचा पुन्हा एकदा जिभेवरील ताबा सुटला. 


अंबादास दानवे आणि अरविंद सावंत यांच्यावर शेलक्या शब्दात टीका


संजय गायकवाड यांनी अंबादास दानवे आणि अरविंद सावंत यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. आमदार दानवे म्हणजे गल्लीतील Xत्रा असल्याची टीका संजय गायकवाड यांनी केली. तो मागच्या धारा निवडून येतो, असे संजय गायकवाड म्हणाले. गायकवाड पुढे म्हणाले की, आज आक्रोश मोर्चाला चारशे रुपये देऊन लोक जमा केली गेली होती. हीच दानवेची औकात आहे. जे काही बुलढाण्यामध्ये भुंकून गेला ते सगळे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. मालवणचा पुतळा काही सरकारने उभारला नव्हता तो नेव्हीकडून उभारण्यात आला होता, असेही संजय गायकवाड म्हणाले. अरविंद सावंतची माझ्यावर बोलण्याची औकात नाही असेही गायकवाड म्हणाले.


ठाकरे गडाकडून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जन आक्रोश मोर्चा


दरम्यान, बुलढाणामध्ये आज शिवसेना ठाकरे गटाकडून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे, अरविंद सावंत यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले. बैलगाडीसह मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी दानवे यांनी मोर्चामध्ये जमिनीवर आसूड ओढत सरकारचा निषेध केला. 


वाचावीरांची दखल घ्यावी असं मला वाटत नाही


अंबादास दानवे यावेळी बोलताना म्हणाले की राज्यातील वाचावीरांची दखल घ्यावी असं मला वाटत नाही. त्यांचा जीव किती आणि बोलतात किती अशी विचारणा त्यांनी केली. मी जरी विरोधी पक्षात असले तरी नरेंद्र मोदींबद्दल बोलू शकत नाही. मी राज्यातील नेत्यांवर बोलू शकतो. मात्र, तुम्ही सरळ राहुल गांधी यांना बोलणं योग्य नसल्याचे अंबादास म्हणाले. आरक्षणाबाबत जी शरद पवार साहेबांची भूमिका आहे तीच आमची असल्याचे त्यांनी सांगितले.


राज्यात हा शेतकऱ्यांची अडणवूक केली जात आहे. फसवणूक होत आहे. कापूस, सोयाबीन शेतकरी संकटात असून यासाठी आक्रोश मोर्चा काढला असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री कोण होईल यापेक्षा यांना घरी बसवणं गरजेचं असल्याचे दानवे म्हणाले. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणावरून दानवे यांनी सरकावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, सरकार मनोज जरांगे यांच्याशी खोटं बोलत आहे. त्यांना फसवत आहे, त्यांच्या उपोषणाची खिल्ली उडवले जात आहे. सरकारला परिणाम भोगावे लागतील असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. 


इतर महत्वाच्या बातम्या