Maharashtra Ambulance Service : राज्यातील जनतेला व अत्यावश्यक गंभीर रुग्णाला तात्काळ रुग्णवाहिका (Ambulance) आणि वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करुन महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्विसेस अर्थात MEMS हा प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पांतर्गत राज्यात नागरिकांच्या 24 तास अत्यावश्यक सेवेसाठी 1000 रुग्णवाहिका ही तैनात केल्या आणि 108 हा हेल्पलाईन नंबरही सुरु केला. शासनाचा हा प्रकल्प भारत विकास ग्रुप अर्थात BVG या खाजगी कंपनीकडे चालवण्यासाठी दिला आहे. मात्र सुरुवातीला काही वर्षे हा प्रकल्प अत्यंत यशस्वी म्हणून समोर आला. रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत असल्याने लाखो रुग्णाचे प्राणही वाचले. पण आता हीच जीवनदायिनी सेवा राज्यात कोलमडत असल्याचं चित्र आहे. नियमानुसार कुठल्याही रुग्णाला अपघातात किंवा गंभीर आजाराच्यावेळी 15 ते 20 मिनिटांतच रुग्णवाहिका उपलब्ध झालीच पाहिजे असा नियम आहे. पण आता या सेवेचा रिस्पॉन्स टाईम हा अतिशय वाढला असून अनेक ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने दोन ते तीन तास रुग्णांना ताटकळत बसावं लागत आहे. यामुळे या सेवेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तर ग्रामीण भागातील प्रसुती आणि इतर रुग्णांना याचा फटका बसत असल्याचं राज्यभर चित्र आहे.
बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात MEMS या 108 सेवेच्या 23 रुग्णवाहिका सेवेत आहेत. यातील 5 रुग्णवाहिका या अॅडव्हान्स लाईफ सपोर्टसह आहेत तर 18 बेसिक लाईफ सपोर्टसह आहेत. पण अनेक रुग्णवाहिका या जुनाट झाल्या असून काही नादुरुस्त असतात तर काही वेगाने धावू शकत नाही. त्यामुळे या सेवेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यामुळे मात्र यासेवेतील शासकीय डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांवर तणाव वाढत आहे. तर याचा फटका मात्र प्रसुतीसाठीच्या महिलांना बसत असल्याचं चित्र संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे.
ही सेवा संचालित करणाऱ्या भारत विकास ग्रुपच्या काही अधिकाऱ्यांना याबद्दल विचारणा केली असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. पण ऑफ कॅमेरा त्यांनी दिलेली माहिती सर्वच सांगून जातं.
या सेवेचा अनियमितपणा, रुग्णवाहिकेचा रिस्पॉन्स टाईम का वाढला?
- ही योजना 2014 साली सुरु झाली.
- सुरुवातीला प्रत्येक अॅम्ब्युलन्स ही फक्त 35 किमीवरीलच कॉल घेईल असं ठरवण्यात आलं होतं.
- आता या अॅम्ब्युलन्स 100 किलोमीटरवरील सुद्धा कॉल घेत आहेत.
- त्यामुळे प्रत्येक वाहनाचं रनिंग वाढलं आहे
- नियमाप्रमाणे रुग्णवाहिका ही फक्त 3 लाख किमी अंतरापर्यंतच वापरु शकतो, पण राज्यातील या सेवेतील रुग्णवाहिका या सरासरी 5 लाख किमी अंतरएवढ्या आहेत.
- परिणामी सर्व रुग्णवाहिका जुनाट झाल्या असून नादुरुस्तीचं प्रमाण वाढलं.
- गेल्या आठ वर्षात या सेवेसाठी एकही नवीन रुग्णवाहिका घेण्यात आली नाही.
यामुळे मात्र कोट्यवधी रुपये खर्च करुन आता हा प्रकल्प उशिरा सेवा मिळत असल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मात्र याचा फटका सामान्य रुग्णांना बसत असल्याचं चित्र आहे.