Nana Patole : ज्यांनी नागपूरची चड्डी घातली तो थेट जॉईंट सेक्रेटरी होतो, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं आहे. बुलडाणा इथं आयोजित करण्यात आलेल्या भीमशक्ती मेळाव्यात नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) टीका केली. सध्या देशाची व्यवस्था संपवण्याचं काम सुरु आहे. लोकशाहीच्या चारही स्तंभाना संपवण्याचं काम सुरु असल्याचेही नाना पटोले यावेळी म्हणाले. दरम्यान, भाजपचे नेते आणि आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी नाना पटोलेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. 


नेमकं काय म्हणालेत नाना पटोले


सध्या देशाची व्यवस्था संपवण्याचं काम सुरु आहे. लोकशाहीच्या चारही स्तंभाना संपवलं जात आहे. त्यात गोदी मीडिया एक आला, म्हणजे माध्यमाची व्यवस्था त्यांनी संपवली आहे. सुप्रीम कोर्टाचे जजेस माध्यमांच्या समोर येतात आणि म्हणतात, आम्हाला वाचवा...! सुप्रीम कोर्टाचे जजेस आम्हाला वाचवा म्हणतात तर न्याय व्यवस्था ही धोक्यात आली असल्याचे नाना पटोले यावेळी म्हणाले. प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कलेक्टर व्हायचं असेल, एसपी व्हायचं असेल, डीएफओ व्हायचं असेल, फॉरेन सर्व्हिसमध्ये जायचं असेल तर तुम्हाला युपीएससीच्या (UPSC) परीक्षा आधी पास करायच्या होत्या. आत्ता त्या युपीएससीच्या परीक्षा नाहीत. तर आत्ता नागपूरची चड्डी ज्यांनी घातली तो डायरेक्ट जॉईंट सेक्रेटरी होतो अशा प्रकारचे चित्र आपण पाहत असल्याचे पटोले म्हणाले.  काल रात्री उशिरा खामगावात पार पडलेल्या भीमशक्तीच्या मेळाव्यात नाना पटोले बोलत होते.


राम कदमांचा नाना पटोलेंवर पलटवार


जेव्हापासून महाविकास आघाडीचे सरकार गेले, तेव्हापासून फक्त काँग्रेसचेच नव्हे तर तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघलडं असल्याचे भाजप आमदार राम कदम म्हणाले. या नेत्यांना आपण काय बोलतो याचे देखील भान नसल्याचे कदम म्हणाले. सध्या वसुली कार्यक्रम बंद झाला, बदल्यांमधील पैसे बंद झाले, कमिशनखोरी बंद झाली असल्याचे ते म्हणाले. नाना पटोले यांना हाफ पॅन्टचे एवढंच कोड कौतुक असेल तर एकदा त्यांनी संघाच्या शाखेत यावं, मग त्यांना देशप्रेम काय आहे, समर्पित भाव काय आहे, देशासाठी कसं झिजायचं असतचे ते त्यांना कळेल असेही कदम म्हणाले. ज्या काँग्रेसने कायम वसुली कार्यक्रम केला, हिंदूचा द्वेष केला त्या काँग्रेसच्या प्रांत अध्यक्षांकडूम आमच्या फार काही अपेक्षा नसल्याचे राम कदम म्हणाले. तुम्हाला जर संघाविषयी बोलायचे असेल तर संघाच्या शाखेत जा, ज्या दिवशी संघाच्या शाखेत जाल त्या दिवशी तुम्ही सांगाल की आत्तापर्यंत मी चुकीच्या वाटेवर होतो असेही कदम म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या: