Buldhana Ravikant Tupkar : बुलढाणा : माझे शेतकरी चळवळीतील गुरु हे राजू शेट्टी (Raju Shetti) नसून शरद जोशी (Sharad Joshi) आहेत, तसेच राजू शेट्टी हे सतत चळवळीतील आणि राजकीय भूमिका (Political Role) बदलत असतात. त्यामुळेच त्यांच्या भूमिकेशी मी सहमत नाही, असं थेट स्पष्टीकरण देत रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी आणि त्यांची भूमिका वेगळी असल्याचं म्हटलं आहे.


दरम्यान, कधीकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत असलेले आणि आज लोकसभेसाठी स्वतंत्र उमेदवार असलेले रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचं थेट सांगितलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 


शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले की, "मी स्वतः माझी उमेदवारी जाहीर केलेली नाही. गावगाड्यातील सामान्य लोकांनी माझी उमेदवारी जाहीर केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जनतेचा आग्रह आहे की, मी आगामी लोकसभा निवडणूक लढवावी. लोकांनी आग्रह केला की, या निवडणुकीत तुम्ही उतरायचं आहे. त्यांच्याच आग्रहामुळे मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. अतिशय जोरदार तयारी आमची सुरू आहे. लोक भरभरून वर्गणीही देत आहे. मी प्रस्तापितांसारखा निवडणूक लढवणार नाही, कारण मी चळवळीतला फाटका कार्यकर्ता आहे. गावागावातून एक लाख, दोन लाख रुपयांची वर्गणी माझ्यासाठी देत आहेत. माझा बुलढाण्याचा दौरा संपलेला आहे. प्रस्तापित राजकारण्यांना लोक कंटाळलेले आहेत. त्यामुळे चांगल्या चेहऱ्याच्या शोधात लोक आहेत. आम्ही जो 22 वर्ष चळवळीतून संघर्ष केला, त्या संघर्षाचं चीज झालं पाहिजे, असं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे लोकांनी ही निवडणूक हाती घेतली आहे." 


माझे शेतकरी चळवळीतले गुरु शरद जोशी, राजू शेट्टी नाहीत : रविकांत तुपकर 


"मुळात माझे गुरू शेतकरी चळवळीतले स्वर्गीय शरद जोशी आहेत. मी ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो, त्यावेळी मी शरद जोशींच्या संपर्कात आलो. त्यावेळी मी त्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो. मला जे काही चळवळीचे धडे मिळाले, ते स्वर्गीय शरद जोशींकडून मिळाले. निश्चितच मी राजू शेट्टींच्या संघटनेत काम करत होतो, काम करतोय. पण त्यांची भूमिका सातत्यानं बदलत असते. आधी ते म्हणत होते की, आम्ही 6 जागांवर स्वतंत्र लढू, त्यानंतर म्हणाले की, महाविकास आघाडीनं मला एकट्याला पाठिंबा दिला, तर बाकीच्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. म्हणजेच, त्यांची भूमिका फारच संशयास्पद आहे. त्यांनी भूमिका तशीच असते. त्यात काही नवीन आहे असं नाही.", असं रविकांत तुपकर म्हणाले. 


माझ्या उमेदवारीमुळे प्रस्थापितांच्या पाया खालची वाळू सरकली : रविकांत तुपकर 


"माझ्या उमेदवारीमुळे प्रस्थापितांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. माझ्या उमेदवारीमुळे महायुती आणि महविकास आघाडीची समीकरणं बिघडली आहेत, त्यामुळे त्यांची उमेदवारी घोषित होण्यास वेळ लागत आहे. संसदेच्या भिंतीनं कधी सोयाबीन हा शब्द ऐकला नाही आणि त्यामुळे सोयाबीन आणि कापसाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मी संसदेत जाण्याचं ठरवलं आहे.", असं रविकांत तुपकर म्हणाले. 


शरद पवारांनी महाविकास आघाडीकडून तुपकरांची शिफारस केली? 


शरद पवारांनी माझी महाविकास आघाडीकडून शिफारस केली आहे, हे मी माध्यमातूनंच पाहिलं आहे. मात्र, तसं काही नाही. या बातम्या कोण आणि कशासाठी पेरतं मला माहीत नाही. मी कुठल्याही पक्षाचा किंवा आघाडीचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच नाही. मला जिल्ह्यातील सर्व सामान्यांनी निवडून देण्याचं ठरवलं आहे. माझ्या उमेदवारीनं प्रस्थापितांची झोप उडाली आहे, असंही रविकांत तुपकर म्हणाले आहेत.