Agriculture Day Special: बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचा तरुण शेतीचा डॉक्टर बनला आहे. डॉ अनंत इंगळे असं या शेतीच्या डॉक्टरांच नाव आहे. राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ संशोधन सहयोगी म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. गंगाई ऍग्रो क्लिनिकच्या माध्यमातून ते अनेकांना शेतीविषयक सल्ले देतात. अनंत कित्येक शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करण्याचं काम करत आहेत.


शेती हा एक निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे, आपला देश कृषी प्रधान आहे, परंतु सद्यस्थितीला शेती क्षेत्रात काम करणारे लोक खूप कमी आहेत, शेती विषयक उच्च शिक्षण घेऊन नोकरी लागली की कृषी संदर्भात विचार केला जात नाही किंवा त्या दृष्टीने बघितलंं जात नाही, उच्च शिक्षण घेऊन शेतीचा डॉक्टर होण्याची इच्छा कोणाचीच नसते. मात्र अनंत यांनी वेगळा विचार करुन  हा मार्ग निवडला. त्याच्या शेतीच्या दवाखान्यात सर्व प्रकारच्या शेती विषयक मुद्द्यावर मार्गदर्शन केले जाते तसेच अडचणीवर सल्ला दिला जातो, तसेच व्हॉट्स ॲप ग्रुप आणि मोबाईल कॉल च्या माध्यमांतून योग्य तो सल्ला दिला जातो व त्यातून खर्च कसा कमी होईल याकडे लक्ष दिले जाते, असं ते सांगतात.



गेली दोन, तीन वर्षापासून ते हे कार्य करत आहेत. यातून अनेक शेतकरी वर्गाला फायदा झाला आहे. प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने शंका निरसण करून शेतकरी वर्गाला अतिशय चांगला फायदा होत आहे. योग्य ते रासायनिक , सेंद्रिय, औषधांचा वापर, रासायनिक खते व सेंद्रिय खत यांचा माती परीक्षण करून वापर, शेतकरी मित्रांना लागवड ते काढणीपर्यंत मार्गदर्शन म्हणजेच जमिनीच्या प्रकारानुसार वाण निवड, खत व्यवस्थापन आणि सर्वच गोष्टी व्यवस्थित समजून सांगितल्या जातात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
 
अनेक शेतकरी बांधवांना नवीन वाणांची माहिती , नवीन तंत्रज्ञान तसेच नवीन गोष्टी समजावून सांगतात. विविध प्रकारचे कार्यक्रम आणि शेतकरी मेळावा यांचे ऑनलाईन व प्रत्यक्ष शेतावर आयोजन करुन शेतकरी वर्गाला फायदा झाला आहे, प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकाची अवस्था बघून मार्गदर्शन तसेच कीड व रोग व्यवस्थापनचा देखील सल्ला ते देतात. रासायनिक व सेंद्रिय दोन्हींचा योग्य व समतोल वापर त्यामुळं खर्च कमी झाला आहे. उच्च शिक्षण घेऊन शेतीक्षेत्रात काम करत असलेले युवा वर्ग मार्गदर्शन करतो.असे अनेक उपक्रम राबविले जातात जेणेकरून शेती व शेतकरी यांचा विकास होईल. याकडे माझा कल असतो, असंही ते सांगतात.